Join us  

Sunrise hospital Fire: वेळेत बाहेर न काढल्याने व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा मृत्यू; सनराईज हॉस्पिटल आगीत मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 1:19 PM

Bhandup Sunrise hospital Fire: मॉलच्या पहिल्या मजल्याला आग लागली आणि त्याचा धूर सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या सनराईज हॉस्पिटलपर्यंत पोहोचला. मात्र, मुंबई पालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने सर्व रुग्णांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आल्याचे हॉस्पिटलने म्हटले होते.

मुंबई : राज्यात कोरोना संकट वाढत असताना आरोग्य यंत्रणेची, ह़ॉस्पिटलची मोठ्या प्रमाणावर गरज भासत होती. यामुळे कोरोना संकटामध्ये आरोग्य सुविधा वाढविण्याच्या उद्देशाने कोविड हॉस्पिटल म्हणून भांडुपच्या ड्रीम्स मॉ़लमध्ये सनराईज हॉस्पिटलला परवानगी देण्यात आल्याचा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackreay) केला आहे. (CM Uddhav Thackreay Visit to Bhandup Dream Mall Fire spot.)

ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीत हे हॉस्पिटलही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले आहे. यामध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झालेला आहे. दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि नंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आगीतील मृत्यू का झाले याचे कारण सांगितले. 

व्हेंटिलेटरवरील रुग्णांना हलविण्यासाठी वेळ लागला. अन्य कोरोना रुग्णांना तातडीने हलविण्यात आले. यामध्ये व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले आहे. दुर्घटना घडल्यानंतर आपण जागे होतो. या प्रकरणाचीही चौकशी होईल. अशा घटना होऊ नयेत म्हणून राज्यात ज्या ज्या ठिकाणी कोविड हॉस्पिटल, जम्बो सेंटरचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. या हॉस्पिटलची परवानगी येत्या ३१ मार्चला संपणार होती, असेही ठाकरे म्हणाले. 

 

ज्या रुग्णांचा यामध्ये मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांची मी दिलगिरी व्यक्त करतो. जे या प्रकरणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

आधी हॉस्पिटलचा मृतांवरून इन्कार

मॉलच्या पहिल्या मजल्याला आग लागली आणि त्याचा धूर सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या सनराईज हॉस्पिटलपर्यंत पोहोचला. मात्र, मुंबई पालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने सर्व रुग्णांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आल्याचे हॉस्पिटलने म्हटले आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेहॉस्पिटलआग