Join us

उंदराने डाेळा कुरतडलेल्या ‘त्या’ रुग्णाचा अखेर मृत्यू; राजावाडी रुग्णालयातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 07:25 IST

राजावाडी रुग्णालयात  उंदराने  डाेळा कुरतडलेल्या श्रीनिवास यल्लप्पा (२४) या रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला.

मुंबई : राजावाडी रुग्णालयात  उंदराने  डाेळा कुरतडलेल्या श्रीनिवास यल्लप्पा (२४) या रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. श्रीनिवास याला मेंदूज्वर होता, यकृतही खराब झाले होते.  मागील तीन दिवस त्याच्यावर घाटकाेपर येथील राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मंगळवारी सायंकाळी त्याचा डोळा उंदराने कुरतडला. बुधवारी त्याचा मृत्यू झाला. रात्री आठच्या दरम्यान मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवले, हे सांगताना बहीण यशोदा यांचे डोळे पाणावले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल. 

भंगारामुळे उंदरांचा वावर; स्थायी समितीत तीव्र पडसाद

रुग्णाच्या डाव्या डोळ्याचा काही भाग उंदराने कुरतडल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. ठेकेदाराने आयसीयू समोर भंगार सामान ठेवल्याने उंदरांचा वावर वाढल्याचे कारण समोर आले. याची गंभीर दखल घेऊन पालिकेने स्पष्टीकरण द्यावे असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त करत चौकशीची मागणी केली. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ठेकेदाराचे काम रद्द करण्याची मागणी केली. तर, सदस्यांनी राजावाडीतील आयसीयू विभाग ठेकेदाराकडून काढून महापालिकेने ताब्यात घ्यावा, अशी मागणी केली.

‘...त्यावेळी प्रशासन काय करत हाेते?’

राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग क्रिटीकेअर या ठेकेदाराला चालवण्यासाठी देण्यात आला आहे. या अतिदक्षता विभागासमोर भंगाराचे सामान असताना प्रशासन काय करीत होते ? त्यांचे लक्ष नव्हते का? हे सामान हलवण्यासाठी ठेकेदाराला का सांगिले नाही, असे प्रश्न स्थायी समितीने केले.

टॅग्स :मृत्यूमुंबई महानगरपालिका