‘केईएम’मधील रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 08:15 IST2025-05-20T08:15:20+5:302025-05-20T08:15:38+5:30
जानेवारी ते एप्रिलपर्यंत कोविड रुग्णांची संख्या कमी आढळली. मेपासून किंचित वाढ झाली आहे.

‘केईएम’मधील रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे नाही
मुंबई : केईएम रुग्णालयातील त्या दोन रुग्णांचा मृत्यू कोविड-१९मुळे झालेला नाही, तर सहव्याधीमुळे ते दगावले, असा दावा मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. दगावलेल्या १४ वर्षांच्या मुलीला मूत्रपिंडाचा दुर्मीळ आजार होता, तर ५४ वर्षीय महिलेला कर्करोग होता. या आजारांमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी निश्चित केले. हे रुग्ण मुंबईबाहेरील (सिंधुदुर्ग आणि डोंबिवली) येथे वास्तव्यास होते, अशी माहिती प्रशासनाने दिली. जानेवारी ते एप्रिलपर्यंत कोविड रुग्णांची संख्या कमी आढळली. मेपासून किंचित वाढ झाली आहे.
रुग्ण अत्यंत कमी
‘कोविड-१९’ हा आजार आता एक प्रस्थापित आणि निरंतर आरोग्य समस्या म्हणून गणला जातो. या रोगाच्या विषाणूचे रुग्ण अत्यंत कमी प्रमाणात अधूनमधून आढळतात. गेल्या काही दिवसांत सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळले आहे, असे महापालिकेने म्हटले आहे.
सुविधा कोणत्या?
सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात २० खाटा, २० खाटा मुले आणि गरोदर स्त्रियांसाठी, तर ६० सामान्य खाटा सज्ज आहेत. कस्तुरबा रुग्णालयात २ अतिदक्षता खाटा आणि १० खाटांचा वॉर्ड सज्ज आहे, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
लक्षणे काय?
ताप, खोकला (कोरडा किंवा कफयुक्त), घसा खवखवणे किंवा दुखणे, थकवा, अंगदुखी आणि डोकेदुखी. सर्दी, नाक वाहणे, चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होणे, अशी लक्षणेही दिसतात. गंभीर परिस्थितीत श्वास घ्यायला त्रास होणे, हे एक धोक्याचे लक्षण आहे.