Join us  

पुण्यतिथी विशेष : गाव-खेड्यातील पोरांना आमदार मंत्री बनवणारे 'अजरामर बाळासाहेब' 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 8:04 AM

बाळासाहेब ठाकरें यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियावरुनही अनेकजण आपल्या आठवणी शेअर करत आहेत

मुंबई - शिवसेना प्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची आज 7 वी पुण्यतिथी आहे. त्यासाठी, जगभरातून बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात येत आहे. 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब अनंतात विलिन झाले. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्या नावाचा अजरामर जागर बाळासाहेबांनी केला. सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना, बेरोजगारांना आमदार, खासदार मंत्री बनवणारा नेता म्हणून बाळासाहेबांची महाराष्ट्राला ओळख आहे. 

बाळासाहेब ठाकरें यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियावरुनही अनेकजण आपल्या आठवणी शेअर करत आहेत. सोशल मीडियातूनह मोठ्या प्रमाणात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. तसेच, मुंबईतील शिवाजी पार्क येथील शिवतिर्थावर महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आंदरांजली वाहण्यासाठी येत आहे. सन 1966 साली आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांचे वडिल प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पक्षाचे शिवसेना असे नामकरण केले. त्यानंतर, शिवसेनेने कधीही मागे वळून पाहिले नाही. सन 1972 साली वामनराव महाडिक यांनी शिवसेनेच्या तिकिटावर परेळ मतदारसंघातून विजय मिळवला होता. महाडिक हे शिवसेनेचे पहिले आमदार ठरले. त्यानंतर, 1990 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे 52 उमेदवार विजयी झाले. त्यावेळी, भाजपाला 42 जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर 1995 साली शिवसेना 73 तर भाजपा 65 जागांवर विजयी झाली. सन 1999 मध्ये शिवसेनेनं 69 जागांवर विजय मिळवला, तर भाजपाने 56 जागा जिंकून अपक्षांच्या मदतीने सेना-भाजपा युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं. 

जन्मापासूनच आक्रमक, निर्णयावर ठाम, धाडसी निर्णय, 'अरे'ला कारे आणि तडजोड मान्य नसलेल्या सैनिकांची सेना म्हणजे शिवसेना. म्हणूनच शिवसेना ही अल्पावधीतच ग्रामीण भागात रुजली, गावकडच्या युवकांनी बाळासाहेबांना दैवत मानून शिवसेनेसाठी काम केलं. म्हणून गावा-खेड्यात शिवसेना वाढत गेली. बाळासाहेब हाच विचार, शिवसेना हाच विचार मानून शिवसैनिकांनी एकनिष्ठेचं उदाहरण इतर पक्षांपुढे ठेवलं. दिसला बाण की मार शिक्का असं घोषवाक्यच 1995 ते 2004 या कालावधीपर्यंत राज्यात दिसत होतं. मात्र, बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना बदलत गेली. बाळासाहेबांनी गरीब अन् शेतकरी कुटुंबातील मुलांना उमेदवारी देऊन विधानसभेत पोहोचवले. बार्शीचे राजेंद्र राऊत, परभणीचे बंडू जाधव, हदगावचे सुभाष वानखेडे, दारव्याचे संजय राठोड, जळगावचे गुलाबराव पाटील यांच्यासारखे सर्वसामान्य तरुण कार्यकते शिवसेनेचे आमदार झाले, जे पुढे खासदार आणि राज्यमंत्री झाले. ही ताकद होती बाळासाहेबांची. ही ताकद होती, बाळासाहेबांच्या शिवसेनेची. ही ताकद होती बाळासाहेबांच्या एका सभेची. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय पटलावर बाळासाहेब हे नाव अजरामर आहे.  

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेशिवसेनामृत्यूमुंबई