Join us
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाईसाठी ३१ मे ची डेडलाइन, नाल्यांवर जाळ्या बसवा; आयुक्त अश्विनी भिंडेचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:02 IST

'दादर धारावी नाला डागडुजीचे काम विनाविलंब करावे'

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ मे पर्यंत १०० टक्के नालेसफाई पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर शहरात ज्या नाल्यांमध्ये कचरा टाकला जातो, तेथे जाळ्या बसवाव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.

शहर विभागातील नाले आणि मिठी नदीतील गाळ उपशाच्या कामांची, वांद्रे-कुर्ला संकुलातील जेतवन उद्यान येथे मिठी नदी, वरळी येथील  नेहरू विज्ञान केंद्राजवळील नाला, दादर धारावी नाला येथे सुरू असलेल्या कामांची भिडे यांनी पाहणी केली. 

यावेळी अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  मिठी नदीच्या संपूर्ण क्षेत्रात तसेच लहान-मोठ्या नाल्यांमध्ये जेथे पावसाळ्यात पाणी साचते, अशा ठिकाणांना नजरेसमोर ठेवून कचरा आणि नाल्यांमधील गाळ प्राधान्याने काढावा, असे त्यांनी सांगितले.

मेनहोल उघडे राहिल्यास होणारी दुर्घटना लक्षात घेता, मोठ्या पर्जन्य जलवाहिन्यांवरील मेन होलची तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मिठी नदीच्या तीन टप्प्यांत सुरू असलेल्या स्वच्छतेची माहिती घेतल्यानंतर गाळ काढण्याच्या कामावर काटेकोरपणे लक्ष ठेवा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

‘दादर धारावी नाला डागडुजीचे काम विनाविलंब करावे’

दादर धारावी नाल्यात नागरिकांकडून सर्रास कचरा फेकला जात असून, ती एक मोठी समस्या आहे. या नाल्याच्या वरील भागांत काही ठिकाणी भिंत खचली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर संबंधित विभागाने डागडुजीचे काम विनाविलंब करावे, अशी सूचना भिडे यांनी केली.

मेट्रो, रस्ते विभागाशी समन्वय

पावसाळ्यात वरळी नाका, सात रस्ता परिसरातील सखल भागांत पाणी साचते. त्यामुळे त्याचा निचरा व्हावा, यासाठी मेट्रो, रस्ते विभाग यांच्या समन्वयाने पर्जन्य जलवाहिन्यांना संलग्न असणाऱ्या जोडण्या योग्य पद्धतीने राहतील, याची दक्षता घेतली जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : May 31 deadline for drain cleaning; install nets: Commissioner

Web Summary : Commissioner Bhide instructed officials to complete 100% drain cleaning by May 31 and install nets to prevent waste. She inspected Mithi river and drain cleaning work, emphasizing priority removal of garbage and silt. Coordination with Metro and road departments is crucial for drainage.
टॅग्स :मुंबई महानगरपालिकाअश्विनी भिडेपाऊस