कोस्टल रोडच्या ‘प्रोमिनेड’ची डेडलाइन हुकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:40 IST2025-06-14T13:39:29+5:302025-06-14T13:40:33+5:30
Coastal Road Mumbai: सागरी किनाऱ्याचा नागरिकांना आनंद लुटता यावा, यासाठी पालिकेकडून मरिन ड्राइव्हप्रमाणेच वरळी सी-फेसपर्यंत विहारपथ (प्रोमिनेड) उभारला जात आहे. त्याचे काम १५ जूनपर्यंत होणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे या कामाला विलंब होत आहे.

कोस्टल रोडच्या ‘प्रोमिनेड’ची डेडलाइन हुकली
मुंबई - सागरी किनाऱ्याचा नागरिकांना आनंद लुटता यावा, यासाठी पालिकेकडून मरिन ड्राइव्हप्रमाणेच वरळी सी-फेसपर्यंत विहारपथ (प्रोमिनेड) उभारला जात आहे. त्याचे काम १५ जूनपर्यंत होणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे या कामाला विलंब होत आहे. आतापर्यंत ८० टक्के हे काम पूर्ण झाले आहे. जूनअखेर हे काम पूर्ण करून जुलैमध्ये विहारपथ खुला करण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
नरिमन पॉइंटपासून दहीसरपर्यंत वेगाने पोहोचता यावे, यासाठी कोस्टल रोड टप्प्याटप्प्याने बांधण्यात येत आहे. या मार्गाचा शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी वांद्रे सी-लिंकच्या टोकापर्यंत १०.५८ किमीचा पहिला टप्पा बांधण्यात आला. या मार्गावरून १२ मार्च २०२४ पासून आतापर्यंत ५० लाखांपेक्षा जास्त वाहनांनी वाहतूक केली आहे. दरम्यान, कोस्टल रोडवर प्रियदर्शनी पार्क ते हाजी अली आणि बडोदा पॅलेस ते वरळी सी-फेस अशा दोन टप्प्यांत विहारपथाचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास ७.५ किमी लांब असलेल्या मार्गावरून मुंबईकरांना सागरी किनाऱ्याचा आनंद लुटता येणार आहे.
भुयारी मार्गातून थेट विहारपथावर
विहारपथाच्या कामाबरोबर सीसीटीव्ही बसवण्याची कामे गतीने सुरू आहेत. सुरक्षेचे सर्व उपाय केल्यानंतरच या मार्गावर वरळीच्या दिशेने जाताना बोगद्याबाहेर, ब्रिच कँडीजवळ, वरळीतील पूनम चेंबरमागील बाजू आणि वरळी डेअरीसमोरच दोन्ही दिशेला बसथांबे उभारण्यात येणार आहेत.
त्याकरिता जागांची पाहणी करण्यात आली आहे. या जागांच्या जवळ सबवे (भुयारी मार्ग) असून, बेस्ट बसमधून उतरताच या सबवेतून प्रवाशांना
पूर्व-पश्चिम दिशेला निश्चित केलेल्या ठिकाणी जाता येणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.