‘सर्वपित्री’चे पिंडदान आले बाणगंगा तलावामधील माशांच्या मुळावर; पर्यावरणप्रेमींची प्रशासनावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 11:32 IST2025-09-24T11:28:14+5:302025-09-24T11:32:30+5:30
दरवर्षी या काळात तलावातील मासे मरतात. यासाठी गतवर्षी पालिका प्रशासनाने तलावासाठी वायूविजन व्यवस्था केली होती.

‘सर्वपित्री’चे पिंडदान आले बाणगंगा तलावामधील माशांच्या मुळावर; पर्यावरणप्रेमींची प्रशासनावर टीका
मुंबई - सर्वपित्री अमावास्येच्या दुसऱ्या दिवशीपासूनच वाळकेश्वर परिसरातील बाणगंगा तलावात मृत मासे तरंगताना दिसत आहेत. पितृपक्ष, तसेच अमावास्येला धार्मिक विधीनंतर पिंडदानाच्या पिठाचे गोळे, पूजाविधीनंतरचे साहित्य तलावात विसर्जित केल्याने पाणी दूषित होऊन ते माशांच्या जिवावर बेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे मृत मासे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून तलावातून काढले जात आहेत.
रविवारी सर्वपित्री अमावास्येला बाणगंगेवर धार्मिक विधींसाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी निर्माल्य, पिंड आणि इतर साहित्य थेट तलावात टाकल्याने पाणी दूषित झाले होते. तलावातील पाण्यात अन्नपदार्थ टाकू दिले जाणार नाही, अशी ग्वाही पालिकेने दिली होती. मात्र, ती फोल ठरली.
पाण्यावर तेलाचे तवंग
विसर्जन केलेल्या पदार्थांमुळे पाण्यावर तेलाचे तवंग तयार होतात. यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने माशांचा मृत्यू झाल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. दरवर्षी या काळात तलावातील मासे मरतात. यासाठी गतवर्षी पालिका प्रशासनाने तलावासाठी वायूविजन व्यवस्था केली होती, तसेच पूजा विधीचे साहित्य गोळा करणारे एक यंत्रही तलावात सोडले होते. मात्र पालिकेचे सगळेच प्रयत्न फोल ठरले आहेत. या संदर्भात सहाय्यक आयुक्तांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उपलब्ध झाले नाही.
‘अनेकदा तक्रारी करूनही काही उपयोग होत नाही’
स्थानिक तसेच पर्यावरणप्रेमींनी याआधी देखील प्रदूषणाबाबत वेळोवेळी तक्रार केली होती. मात्र, यात काहीही बदल झालेला नाही. पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याबाबतीत निष्क्रियच असून परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
वर्षानुवर्षे चाललेला हा निष्काळजीपणा आता सहन केला जाणार नाही. आपल्या तलावांचे रक्षण करणे ही केवळ पर्यावरणीय जबाबदारी नाही तर घटनात्मक कर्तव्यदेखील आहे. - रोहित जोशी, येऊर एन्व्हार्यन्मेंटल सोसायटी