Join us  

“बिच्चाऱ्या अंबादास दानवेंना का त्रास देताय? पण अमित देशमुख...”; देवेंद्र फडणवीस थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 2:44 PM

Devendra Fadnavis: आम्ही ऑपरेशन केले तर ते तुम्हाला कळत नाही. निवडणूक काळात ऑपरेशन, भूकंप होत असतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासह महायुतीतील मित्र पक्षांमध्ये इन्कमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नूषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाजपामधील पुढील पक्षप्रवेशाबाबत माहिती दिली.

ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या भाजपाप्रवेशाबाबत काही दावे केले जात होते. मात्र, अंबादास दानवे यांनी यावर स्पष्टीकरण देत कुठेही जात नसल्याचे स्पष्ट करताना चुकीची बातमी दाखवल्याप्रकरणी मीडियाला धारेवर धरले. याबाबत पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंबादास दानवे, अमित देशमुख भाजपामध्ये येणार नाहीत. विरोधी पक्षात असले म्हणून कोणत्याही नेत्याला उगाच संशयाच्या फेऱ्यात आणणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बिच्चाऱ्या अंबादास दानवेंना का त्रास देताय?

अंबादास दानवेशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांच्या प्रवेशाची चर्चा नाही. का बिच्चाऱ्या अंबादास दानवेंना परेशान करत आहात? असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आम्ही ऑपरेशन केले तर तुम्हाला कळत नाही. तुम्हाला कळले तर ते ऑपरेशन नाही. आम्ही जो भूकंप करणार आहोत असे तुम्ही सांगत आहात, तो कोणता भूकंप आहे ते तरी आम्हाला सांगा. असा काही भूकंप होणार हे आम्हालाच माहिती नाही. तुमच्याकडूनच ऐकतोय. निवडणूक काळात ऑपरेशन, भूकंप होत असतात. पण आताच्याघडीला कोणताही भूकंप होणार नाही,  असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, काँग्रेस नेते अमित देशमुख माझ्या संपर्कात नाही. त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा नाही, असे सांगताना महायुतीच्या जागावाटपाबाबत बोलताना म्हणाले की, आमचे चार पाच जागांवर अडलेले आहे. एक जागा अडली तर तीन जागा अडल्या जातात. फार अडले आहे, असे नाही. थोडे अडले आहे. तो तिढा आज उद्या सुटेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपालोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४