मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपा सरकार आल्यापासून, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा चेहरामोहराचा बदलून गेला आहे. गतिमान कारभार, लोकाभिमुख व स्वच्छ प्रतिमा या त्रिसूत्रीमुळे, परदेशात आणि देशातही नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळवून देण्यात केंद्र शासनाला यश आले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये देशात तब्बल २३५ नवीन पासपोर्ट कार्यालये सुरू करण्यात आल्याचे, केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी सांगितले.प्रत्येक राज्यात विदेश भवन उभारण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणानुसार, आज वांद्रे कुर्ला संकुलातील विदेश भवनाचे सुषमा स्वराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र राज्यमंत्री विजय कुमार सिंह, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते.गेल्या तीन वर्षांत ५० हजार नागरिकांचीसुटका करून, त्यांना मायदेशी आणण्यात केंद्र सरकारला यश आले आहे. २०१४ पर्यंत देशात केवळ ७७ पासपोर्ट कार्यालये होती. मात्र, गेल्या सहा महिन्यांत त्यात २३५ नवीन पासपोर्ट कार्यालयांची भर पडली आहे. प्रत्येक राज्यात विदेश भवन उभारून, परराष्ट्रसंबंधीच्या सेवा नागरिकांना दिल्या जाणार आहेत. पासपोर्ट कायद्यातील सुधारणा करून, त्यातील अनावश्यक व अव्यवहारी नियम काढून टाकण्यात आल्याचेही स्वराज यांनी सांगितले.देशातील पहिले क्षेत्रीय विदेश भवन महाराष्ट्रात उभारण्यात आले आहे. विदेश भवनाच्या माध्यमातून परराष्ट्रासंबंधीच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देशातील पहिले विदेश भवन मुंबईत उभारले आहे. कुठल्याही प्रकल्पाची सुरुवात मुंबईतून केली, तर ती नक्कीच यशस्वी ठरते. राज्याने पासपोर्टसाठी केली जाणारी पोलीस पडताळणीची सुविधा आॅनलाइन उपलब्ध करून दिल्यामुळे, २४ ते ४८ तासांमध्ये पासपोर्ट मिळत आहेत. राज्यातील सर्व पोलीस ठाणी डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.देशातील पहिले विदेश भवन महाराष्ट्रात उभारण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नंन्स या तत्त्वावर सरकार नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. या भवनामुळे शिक्षण व नोकरीसाठी परदेशी जाणाºया तरुणांना फायदा होणार असल्याचे, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी सांगितले.
मोदींच्या काळात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा चेहरामोहराचा बदलून गेला - सुषमा स्वराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 05:25 IST