समुद्राचे पाणी गोड करण्याचे दिवास्वप्न; विरोधी पक्षांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 02:24 AM2021-02-09T02:24:38+5:302021-02-09T02:24:54+5:30

ही निव्वळ निवडणुकीपुरती घोषणा -

Daydreaming of sweetening the sea water | समुद्राचे पाणी गोड करण्याचे दिवास्वप्न; विरोधी पक्षांचा आरोप

समुद्राचे पाणी गोड करण्याचे दिवास्वप्न; विरोधी पक्षांचा आरोप

Next

मुंबई : व्यवहार्य नसल्याने गेल्या काही वर्षांपूर्वी महापालिकेने बासनात गुंडाळलेला समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रकल्प पुन्हा पुनर्जीवित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करणायचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी मंजूर करण्यात आला. यामध्ये २०० दशलक्ष लिटर पाण्याच्या निर्मितीसाठी १६०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र हा प्रस्ताव म्हणजे निव्वळ बालहट्ट असून निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेने केलेली घोषणाबाजी असल्याचा आरोप काँग्रेस, समाजवादी पक्षाने केला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारशीनुसार समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रकल्प पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे. यासाठी नियुक्त आय. डी. ई. वॉटर टेक्नॉलॉजीज लिमिटेड या सल्लागार कंपनीला सहा कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच हा प्रकल्प उभारण्यासाठी स्विस चॅलेंज पद्धतीने मूळ सूचकाची नेमणूक करण्याची मागणी प्रशासनाने केली आहे. यासाठी स्थायी समितीने सोमवारी मंजुरी दिली. 
हा प्रकल्प प्रतिदिन २०० दशलक्ष लिटर एवढ्या क्षमतेचा असून, पुढे त्याचा प्रतिदिन ४०० दशलक्ष लिटर एवढ्या क्षमतेपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. २०० दशलक्ष लिटर एवढ्या क्षमतेच्या प्रकल्पासाठी १९०० कोटी रुपये, त्यानंतर २० वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी १९२० कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी सहा हेक्टर जागा व ४०० दशलक्ष लिटरपर्यंत विस्तार केल्यास आठ हेक्टर जागेची गरज भासणार आहे. या प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च हा समुद्रातील पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असल्याने मनोरी येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेली १२ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. ही जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

हा तर युवराजांचा हट्ट... 
समुद्राचे पाणी गोड करणे शक्य झाले तरी ते पिण्यायोग्य नाही. मात्र या प्रकल्पाचा कोणताही अभ्यास न करता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मर्जीखातर हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अशक्य व काल्पनिक आहे. तरीही मुंबईकरांच्या पैशांची लूट सुरू आहे.      - रवी राजा, विरोधी पक्षनेते

महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाची घोषणा झाली आहे; पण करदात्यांचे पैसे पाण्यात घालण्याचे काम शिवसेना करीत आहे.     - रईस शेख, आमदार, गटनेते, समाजवादी पक्ष

Web Title: Daydreaming of sweetening the sea water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.