तक्रार निवारणासाठी आता ‘डॅशबोर्ड’ प्रणाली, महापालिकेच्या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 12:02 IST2025-10-12T12:01:56+5:302025-10-12T12:02:40+5:30
महापालिकेकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची नोंद आता संगणकीकृत पद्धतीने घेतली जाणार आहे. डॅशबोर्डच्या माध्यमातून प्रत्येक तक्रारीची स्थिती, ती कोणत्या अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे आणि तिचे निराकरण झाले की नाही, याची नोंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद मिळणार असून, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढणार आहे.

तक्रार निवारणासाठी आता ‘डॅशबोर्ड’ प्रणाली, महापालिकेच्या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा
मुंबई : मुंबई महानगरपालिकेत नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी वारंवार समोर येतात. अनेकदा लेखी, दूरध्वनी किंवा समाज माध्यमांवरून पाठविलेल्या तक्रारींना प्रतिसाद मिळत नसे. मात्र, आता अशी परिस्थिती राहणार नाही. मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई व्हावी यासाठी तक्रार ‘डॅशबोर्ड’ तयार करण्याचे काम पूर्ण केले असून, येत्या काही महिन्यांत हा उपक्रम कार्यान्वित होणार आहे.
महापालिकेकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची नोंद आता संगणकीकृत पद्धतीने घेतली जाणार आहे. डॅशबोर्डच्या माध्यमातून प्रत्येक तक्रारीची स्थिती, ती कोणत्या अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे आणि तिचे निराकरण झाले की नाही, याची नोंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद मिळणार असून, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढणार आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीत आयुक्तांनी माहिती व तंत्रज्ञान विभागाला हा डॅशबोर्ड तयार करण्याचे निर्देश दिले होते. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ५० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून, शिल्लक कामही अंतिम टप्प्यात आहे.
कारवाईसाठी ‘ट्रॅक’
अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण, पाणीपुरवठा समस्या, कचऱ्याचे प्रश्न, मालमत्ता, आदी तक्रारी आता एकाच ठिकाणी म्हणजे डॅशबोर्डवर नोंदवल्या जाणार असून, त्यावरची कारवाई ट्रॅक करता येणार आहे.