एसी लोकलच्या छतावर धोकादायक प्रवास; शॉक लागल्याने प्रवासी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:49 IST2025-09-23T17:48:44+5:302025-09-23T17:49:32+5:30

उपचारासाठी कळवा येथील शिवाजी रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

dangerous journey on roof of ac local a passenger seriously injured due to shock | एसी लोकलच्या छतावर धोकादायक प्रवास; शॉक लागल्याने प्रवासी गंभीर जखमी

एसी लोकलच्या छतावर धोकादायक प्रवास; शॉक लागल्याने प्रवासी गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मध्य रेल्वेच्या दिवा आणि कोपर स्टेशन दरम्यान एसी लोकलच्या छतावर चढलेल्या प्रवाशाला विजेचा धक्का लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळवा येथील शिवाजी रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मंगळवारी सकाळी अप दिशेची एसी लोकल १० वाजता दिवा स्थानकावर पोहोचणार होती, परंतु सकाळी १०:१२ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर पोहोचली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकलच्या छतावर एक व्यक्ती मागच्या टोकावरून लोकलवर चढला. दरम्यान ट्रेन दिवा स्थानकात येताच, त्या व्यक्तीने खाली उतरण्याचा प्रयत्न केला परंतु अनवधानाने उच्च-व्होल्टेज ओव्हरहेड वायरला स्पर्श केला. त्याला मोठा विजेचा धक्का बसला, ज्यामुळे त्याचे कपडे जळून गेले आणि तो गंभीरपणे जखमी झाला.

सतर्क प्रवाशांनी अलार्म वाजवला आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित कारवाई केली. रेल्वे संरक्षण दलाचे उपनिरीक्षक जे.के.  वर्मा, सहाय्यक उपनिरीक्षक शिवकुमार मीना आणि स्टेशन कर्मचाऱ्यांनी तातडीने आपत्कालीन परिस्थितीत मदत केली. पॉइंट्समन शरद, लोहमार्ग पोलिस (जीआरपी) आणि पोर्टर (हमाल) यांच्या मदतीने जखमी व्यक्तीला छतावरून सुरक्षितपणे खाली आणण्यात आले. या व्यक्तीला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची सध्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

दिवा स्टेशनजवळ घडलेल्या या घटनेमुळे वाहतूक तात्पुरती विस्कळीत झाली. सुमारे २६ मिनिटांच्या उशिराने ती लोकल पुन्हा मार्गस्थ झाली. ट्रेनच्या छतावर प्रवास करणे केवळ धोकादायकच नाही तर रेल्वे कायद्यानुसार गुन्हा देखील आहे. भविष्यात अशा जीवघेण्या घटना टाळण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी जनतेला सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद किंवा असुरक्षित वर्तनाची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: dangerous journey on roof of ac local a passenger seriously injured due to shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.