डान्सबारचा मुखवटा घालून व्यवस्थेचा नाच
By नारायण जाधव | Updated: March 2, 2026 07:37 IST2026-03-02T07:36:51+5:302026-03-02T07:37:04+5:30
डान्स बारची राजधानी म्हणून महामुंबईतील नवी मुंबई, पनवेल परिसराकडे पाहिले जायचे. २००५ मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पनवेलचे आ. विवेक पाटील यांच्या प्रश्नास उत्तर देताना डान्स बार बंदीची घोषणा केली. तिला बारमालकांनी न्यायालयातून स्थगिती मिळवली.

डान्सबारचा मुखवटा घालून व्यवस्थेचा नाच
-नारायण जाधव, उप वृत्तसंपादक
र्केस्ट्रा बारच्या नावाखाली सुरू असलेल्या विकृत आणि बीभत्स व्यवहारांचा प्रश्न पुन्हा विधानसभेत गाजला; पण हा केवळ कायद्याचा नव्हे, तर व्यवस्थेच्या प्रामाणिकतेचा कस पाहणारा मुद्दा आहे. कारण वास्तव इतके उघड आहे की त्यावर पडदा टाकणे आता अशक्य झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार नियमभंग करणाऱ्या बारचे परवाने कायमचे रद्द करण्याचा इशारा दिला असला, तरी जनतेला तो नवा नाही. गेली दोन दशके राज्याने अशाच घोषणा अनेकदा ऐकल्या आहेत. कारवाईचा भाग म्हणून आधी धाड टकली जाते, नंतर दंड केला जातो, पण त्यानंतर अधिक जोमाने ‘छमछम’ पुन्हा सुरू होते.
डान्स बारची राजधानी म्हणून महामुंबईतील नवी मुंबई, पनवेल परिसराकडे पाहिले जायचे. २००५ मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पनवेलचे आ. विवेक पाटील यांच्या प्रश्नास उत्तर देताना डान्स बार बंदीची घोषणा केली. तिला बारमालकांनी न्यायालयातून स्थगिती मिळवली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा बंदी आणली. परंतु आम्हाला डान्सबार नाहीत, तर ऑर्केस्ट्रा बार चालवायचे आहेत, तेथे पैसे उधळणे आणि बारबालांना देहविक्रयास बंदी करू, असे बारमालकांनी सांगितल्याने ऑर्केस्ट्रामध्ये महिलांना काम करण्याची परवानगी न्यायालयाने दिली; परंतु ऑर्केस्ट्रा बारच्या आड जुनेच धंदे सुरू आहेत. याकडे उद्धवसेनेचे मनोज जामसूतकर, भाजपचे सुभाष देशमुख यांनी विधिमंडळात लक्ष वेधले. त्यावर गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी, ऑर्केस्ट्रा बारला नियमाप्रमाणेच परवाने दिले आहेत. तरीसुद्धा एखाद्या बारने तीन वेळा नियमांचा भंग केला तर त्याचा परवाना कायमचा रद्द करण्यात येईल, असे सांगितले. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, बारमध्ये पैसे उडवता येणार नाहीत, असा कायदा असल्याचे स्पष्ट केले आणि गैरप्रकार करणारा बार कायमचा बंद केला जाईल, अशी ग्वाही दिली.
गैरप्रकार थांबविण्याची इच्छा कुणाचीही नाही
नियमभंगाबाबतीत मिळणाऱ्या सवलतीचा फायदा घेऊन अनेक बारमालक मुलींना तोकड्या कपड्यात डान्स करण्यास भाग पाडत आहेत. काही ठिकाणी डान्स बार, तर वर लॉजमध्ये बारबालांची देहविक्री सुरू असल्याचे प्रकार अनेकदा पोलिसांच्या धाडीत उघड झाले आहेत. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट परिसर, कोपरखैरणे, नेरूळ एमआयडीसी, शिरवणे, पनवेल, कळंबोली, महापे, शीळफाटा ते कल्याण रोडवर अनेक लेडिज-डान्स बार सुरू आहेेत. एकदा नव्हे तीन-चार वेळा धाडी टाकूनही बारमालक स्थानिक पोलिसांना ‘मॅनेज’ करून छम छम सुरू ठेवतात.
नोकरनामा न तपासता अन् उत्पादन शुल्क, गुमास्ता विभाग, महापालिका, अग्निशमन विभाग या सर्वांच्या नियमांचे उल्लंघन बारमालक करतात. कारवाईवेळी उत्पादन शुल्क, पोलिस अन् गुमास्ता विभाग एकमेकांकडे बोट दाखवून मलई लाटतात. मोठ्या प्रमाणावर ऑर्केस्ट्रा बार असलेल्या नवी मुंबईत येण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांत “बोली” का लागते, बारमध्ये बांगलादेशी बारबाला सापडूनही मालकांवर कारवाई का होत नाही, याचा शोध का घेतला जात नाही, असा प्रश्न आहे. त्यामुळे कितीही कायदे केले तरी डान्स बार, ऑर्केस्ट्रा बारमधील गैरप्रकार थांबतील का हा प्रश्न आहे.