Join us  

'मुंबईत नियम धाब्यावर बसवून डान्सबार सुरू'; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 3:25 PM

डान्सबारना पोलीसांचेच संरक्षण; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबई: मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्याआड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलीसांचेच संरक्षण आहे. या डान्सबारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, बारचालकांनी सिंडिकेट तयार केले असून, सिंडिकेटमधील बार चालक महिन्याला लाखो रूपये जमा करीत आहेत. जमा झालेल्या रकमेतून पोलीसांना, पोलीसांच्या खबऱ्यांना, स्थानिक गुंडांना हफ्ते दिले जात आहेत. त्यामुळे सिंडिकेटमधील डान्सबारवर कोणतीही कारवाई केली जात नाही. 

डान्सबार पहाटेपर्यंत चालू आहेत. याबाबत स्थानिकांनी पोलीसांकडे तक्रार देऊन देखील डान्सबारवर कोणतीही कारवाई केली जात नाही. याउलट सिंडिकेटमधील बारचालक तक्रारदारालाच धमक्या देत आहेत, मारहाण करीत आहेत. यासंदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील ऑर्केस्ट्राच्याआड सुरू असलेल्या डान्सबारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

टॅग्स :विजय वडेट्टीवारमहाराष्ट्र सरकारपोलिस