प्रबोधन मुंबई टी-२० क्रिकेट स्पर्धेत दादर युनियन संघ विजेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 08:36 IST2018-04-09T08:36:51+5:302018-04-09T08:36:51+5:30

प्रबोधन मुंबई टी-२० क्रिकेट प्रथमच सहभागी होणाऱ्या दादर युनियन संघाने बलाढ्य पय्याडे सी.सी. संघावर १५ धावांनी विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

Dadar union win Prabodhan t-20 Cricket | प्रबोधन मुंबई टी-२० क्रिकेट स्पर्धेत दादर युनियन संघ विजेता

प्रबोधन मुंबई टी-२० क्रिकेट स्पर्धेत दादर युनियन संघ विजेता

 मुंबई - प्रबोधन मुंबई टी-२० क्रिकेट प्रथमच सहभागी होणाऱ्या दादर युनियन संघाने बलाढ्य पय्याडे सी.सी. संघावर १५ धावांनी विजय मिळवत विजेतेपद पटकावले. दादर युनियन संघाच्या २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पय्याडे संघाला निर्धारित २० षटकात केवळ ९ बाद २०२ धावाच करता आल्या. या लढतीत ७७ धावांची झुंजार खेळी करणाऱ्या दिव्यांश सक्सेना याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून प्रबोधन संघाच्या शशांक सिंग (स्पर्धेत १८४ धावा आणि २ बळी आणि दोन वेळा सामनावीर) याची निवड करण्यात आली आणि मोटार बाईक देवून त्याला गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.  विजेत्या दादर युनियनला रोख रुपये एक लाखाचे इनाम तर उपविजेत्या पय्याडे संघाला चषक आणि ५० हजार रुपयांचे इनाम देण्यात आले.  

विजयासाठी २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हर्ष टंक(३९) आणि प्रफुल्ल वाघेला (२४) या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागी रचत पाय्याडे संघाचे आव्हान जिवंत ठेवले. त्यानंतर पराग खानापूरकर (२०) आणि गौरव जठार (४२) यांनी चौथ्या विकेटसाठी ३१ धावांची मोलाची भर टाकली. मात्र अक्षय दरेकर याने अप्रतिम झेल टिपत खानापुरकर याला तंबूचा रस्ता दाखविला आणि त्यांच्या धावगतीस खीळ बसली. खिझार दाफेदार याने चार षटकात २८ धावात ३ बळी मिळवत कमाल केली. हरमीत सिंग याने शेवटी ३ सत्कार ठोकत नाबाद २६ धावांची खेळी केली पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता. अक्षय दरेकर, दिनेश साळुंखे आणि यशस्वी जैस्वाल यांनी टिपलेले झेल सामन्याला कलाटणी देणारे ठरले.  खिझार दाफेदार ,अक्षय दरेकर आणि तनुश कोटियन यांच्या अचूक गोलंदाजीमुळे तसेच कर्णधार साईराज पाटील याच्या कल्पक नेतृत्वामुळे दादर युनियन संघाने विजेतेपदाला गवसणी घातली.  
 तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय  घेणाऱ्या  दादर युनियन संघाला भरभक्कम सलामी करून देण्यात दिव्यांश सक्सेना याने फार मोठी भूमिका बजावली. ३९ चेंडूत ७७ धावांची खेळी साकरणाऱ्या दिव्यांशने  बुजुर्ग दिनेश साळुंखेसह केवळ ८ षटकात ९५ धावा धावफलकावर लावल्या.एरवी आक्रमक असणाऱ्या दिनेशने दिव्यांशचा नूर बघून दुय्यम भूमिका स्वीकारली. हरमीत सिंघने ही जोडी फोडली आणि पाठोपाठ हार्दिक तामोरेला बाद केले. ज्यामुळे दादर युनियनच्या प्रगतीला खीळ बसली. मात्र त्यानंतर कर्णधार साईराज पाटील (२२ चेंडूत ३६ धावा) याने यशस्वी जैस्वालच्या (१८) साथीने चौथ्या विकेटसाठी २६ चेंडूत ५७ धावा जोडल्या. १८२ या धावसंख्येवर हे दोघेही  बाद झाले तरीही  दादर युनियनने  ७ बाद २१७ चा पल्ला गाठला. पाय्याडेचे बलस्थान असलेल्या तेज मध्यमगती गोलंदाजाना आज भरपूर मार पडला. त्यांच्या १२ षटकांमध्ये सव्वाशे धावांची लयलूट प्रतिस्पर्ध्यांनी केली. त्यांना केवळ तीन फलंदाज बाद करता आले. त्यामानाने डावखुरा फिरकी गोलंदाज हरमीत सिंग (४१/२) आणि लेग स्पिनर पराग खानापूरकर (२१/२) यांना अधिक यश मिळाले असले तरी दादर युनियनला रोखण्यात ते अपयशी ठरले.
अंतिम फेरीच्या लढतीला कसोटीवीर उमेश कुलकर्णी, अजित पै, करसन घावरी, सुरु नायक, प्रा. रत्नाकर शेट्टी, रणजीपटू तुकाराम सुर्वे ,अब्दुल इस्माईल, शरद हजारे, विजय कारखानीस, हेमू दळवी  आणि मुंबई क्रिकेटचे माजी सचिव विलास गोडबोले अशी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
 
संक्षिप्त धावफलक : दादर युनियन – २० षटकात ७ बाद २१७ (दिव्यांश सक्सेना ७७, दिनेश साळुंखे २५, हार्दिक तामोरे १७, यशस्वी जैस्वाल १८, साईराज पाटील ३६; पराग खानापूरकर २१/२, हरमीत सिंघ ४१/२) वि.वि. पय्याडे सी.सी. – २० षटकात ९ बाद २०२ (हर्ष टंक ३९, प्रफुल्ल वाघेला २४, गौरव जठार ४२, पराग खानापूरकर २०, हरमीत सिंग नाबाद २६, खिझार दाफेदार २८/३, सिद्धार्थ राऊत ४०/२ ) सामनावीर – दिव्यांश सक्सेना.
मालिकावीर – शशांक सिंग

Web Title: Dadar union win Prabodhan t-20 Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.