दादरच्या फूल बाजारात ३० कोटींची उलाढाल! ८० हजार किलो फुलांची दोन दिवसांमध्ये विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:40 IST2025-10-03T13:40:17+5:302025-10-03T13:40:55+5:30
दादर फुलांच्या बाजारात दसऱ्यानिमित्त दोन दिवसांत सुमारे ७० ते ८० हजार किलो फुलांची विक्री झाली.

दादरच्या फूल बाजारात ३० कोटींची उलाढाल! ८० हजार किलो फुलांची दोन दिवसांमध्ये विक्री
मुंबई : दादर फुलांच्या बाजारात दसऱ्यानिमित्त दोन दिवसांत सुमारे ७० ते ८० हजार किलो फुलांची विक्री झाली. दसऱ्याच्या आदल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे बाजारात उत्साह होता. दोन दिवसांत जवळपास २५ ते ३० कोटींची उलाढाल झाली असावी, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दसऱ्याला झेंडूची फुले आणि आपट्याच्या पानांचे विशेष महत्त्व असते. त्याला मोठी मागणी होती.
नवरात्रोत्सवात झेंडूसह इतर फुलांची आठवडाभर मोठी आवक सुरू होती. पूर्वी लोक फुले आणि आंब्याची डहाळी घेऊन घरोघरी तोरण बनवत. आता तयार तोरणांकडे कल वाढल्याने दादर स्टेशन परिसरात तयार तोरण विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एक मीटर तोरणासाठी ९०-१०० रुपये मोजावे लागले. तोरण महाग असले तरी विजयादशमीचे महत्त्व लक्षात घेऊन तोरण खरेदीतही उत्साह दिसून आला. बुधवारपासून बाजारात घाऊक आणि किरकोळ ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. हिंगोली, सोलापूर, सातारा आणि कर्नाटकातून फुले विक्रीसाठी आली होती. बुधवारी झेंडूची मोठी आवक झाली.
दोन दिवसांत सुमारे ७० ते ८० हजार किलो फुलांची विक्री झाली. गुरुवारी आवक कमी झाल्याने दादरचा फुलबाजार थोडासा थंड होता. एक-दोन दिवसांत बाजारात पुन्हा फुलांची आवक वाढेल.
गणेश मोकल, फुलांचे व्यापारी
झेंडू ३०० रुपये किलो
दादर बाजारात झेंडूला किलोमागे २५०-३०० रुपये भाव होता. गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे फुले ओली झाली होती. तरीही ओली फुले १००-१५० रुपये किलो दराने विकली गेली. आपट्याच्या पानांची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली.