Join us

दादा तुम्ही आले अन् खोके बंद झाले, गुलाबराव पाटलांच्या भाषणाने खसखस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 04:30 IST

अजितदादांचा गट, राष्ट्रवादी हे कोणी सोबत नव्हते तेव्हाही आमच्या युतीने ४३ जागा जिंकल्या होत्या, असा चिमटाही काढायला ते विसरले नाहीत.

मुंबई : ‘अजितदादा तुम्ही आमच्यासोबत आले अन् आम्हाला खोके खोके डिवचणेच बंद झाले. तुम्हाला तर कोणीच खोके वगैरे म्हणत नाही. तुमची काय दहशत आहे ! तुम्हाला कोणी गद्दारही म्हणत नाही’ असे म्हणत पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या बैठकीत शुक्रवारी चांगलीच खसखस पिकवली. 

सुरुवातीची अडीच वर्षे आमच्या तिघांचं (शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस) लव्ह मॅरेज चाललं. मग देवेंद्रभाऊंनी ‘आजा मेरी गाडी में बैठ जा’ म्हटलं, आम्ही तिकडे जाऊन बसलो. आता दादांचे तिसरे इंजिन लागले आहे. आता लोकसभेच्या ४८ जागा जिंकायच्या आहेतच पण आमच्यावेळी (विधानसभा) अडचण येऊ देऊ नका. राष्ट्रवादीलाही सांभाळून घेऊ, घड्याळही चालले पाहिजे अशी बॅटिंग पाटील यांनी केली. त्याला उपस्थित नेत्यांनीही जोरदार दाद दिली. महायुतीच्या बैठकीत यामुळे एकच हशा पिकला. 

‘तेव्हाही ४३ जागा जिंकल्या होत्या...’अजितदादांचा गट, राष्ट्रवादी हे कोणी सोबत नव्हते तेव्हाही आमच्या युतीने ४३ जागा जिंकल्या होत्या, असा चिमटाही काढायला ते विसरले नाहीत. लोकसभेप्रमाणेच विधानसभाही भक्कम बहुमताने जिंकू, काळजी करू नका असा दिलासा नंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गुलाबरावांना दिला.

टॅग्स :गुलाबराव पाटील