Join us  

'दादा भुसे निगेटिव्ह मंत्री, मी त्यांच्या घरी खायला जात नाही'; महेंद्र थोरवेंनी सगळंच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 2:31 PM

Dada Bhuse-Mahendra Thorve: विधानसभेच्या लॉबीत बोलताना मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. 

मुंबई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. मात्र या शेवटच्या दिवशी शिंदे गटातील मतभेद समोर आल्याचे दिसून येत आहे. विधानसभेच्या लॉबीत बोलताना मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. 

मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाला. त्यावेळी मंत्री शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटल्याचं बोलले जाते. या घटनेवर स्वत: महेंद्र थोरवे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आमदारांची कामं होत नसतील, तर काय करणार?, असा सवाल महेंद्र थोरवे यांनी उपस्थित केला.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना महेंद्र थोरवे म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम करतोय. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता करुन देत नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून मंत्री असलेले दादा भुसे यांच्या खात्यातील एका कामाचा पाठपुरावा माझ्यासह भरत गोगावले, खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला होता. दादा भुसे यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील कॉलकरुन देखील सांगितलं होतं की ते काम करुन घ्या. परंतु दादा भुसेंनी अजूनपर्यंत ते काम केलं नाही. त्यामुळे आज त्यांना मी भेटलो आणि विचारलं की दादा बाकीच्या लोकांची कामं तुम्ही बैठकीत घेतली. परंतु माझ्यासह मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं काम तुम्ही केलं नाही. त्यानंतर ते माझ्यासोबत चिडून बोलायला लागले. मी म्हटलं आम्ही स्वाभीमानी आमदार आहोत. मग मंत्र्यांकडून अशी उत्तरं आम्ही का ऐकून घ्यायची. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, मी काय तुमच्या घरी खायला येत नाही. मी सांगितलेलं काम जनतेचं काम आहे, माझ्या मतदारसंघातील काम आहे. मात्र दादा भुसे यांची बोलण्याची पद्धन थोडी वेगळी होती, असं महेंद्र थोरवे यांनी सांगितले.

आमच्यात शाब्दिक चकमक झाली. तुम्ही आमदारांमुळे मंत्री झाले आहेत. मात्र तेच आता अशा पद्धतीने वागल्यामुळे दु:ख होतं, असं महेंद्र थोरवे यांनी सांगितले. कालच्या बैठकीत माझ्या मतदार संघातील काम घ्यायला हवं होतं. माझ्या मतदारसंघाच्या आजूबाजूची कामं होताय. मात्र माझी कामं होत नाही. दादा भुसे एकप्रकारे निगेटिव्ह मंत्री आहेत. जमीनीवर राहून लोकांची कामं करायला हवी. मी दादा भुसेंच्या वयानं खूप लहान आहे. परंतु लोकांची कामं झाली पाहिजे. आमचे बाकीचे मंत्री उत्तम पद्धतीने काम करत आहे. फक्त दादा भुसेंचीच काम करण्याची पद्धत वेगळी आहे, असं महेंद्र थोरवे यांनी सांगितले. तसेच काहीही झालं तरी आम्ही दोघंही शिवसैनिक आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं आहे, की तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर, थोंडावर वाजवून न्याय मिळवा, आणि त्यामुळे आमच्यातला शिवसैनिक जागा झाला. दादा भुसेंनी लोकांची कामं करावी, येवढचं मी सांगेन, असं महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केलं.  

टॅग्स :महाराष्ट्र बजेट 2024एकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकार