मुंबईतील पोलीस ठाण्यात सिलेंडर स्फोट, जप्त साहित्य ठेवलेल्या स्टोअरमध्येच भडका
By गौरी टेंबकर | Updated: December 12, 2022 15:05 IST2022-12-12T15:05:07+5:302022-12-12T15:05:18+5:30
खेरवाडी पोलीस ठाण्यातील प्रकार, जखमी पोलीस अधिकारी सायन रुग्णालयात दाखल

मुंबईतील पोलीस ठाण्यात सिलेंडर स्फोट, जप्त साहित्य ठेवलेल्या स्टोअरमध्येच भडका
मुंबई: खेरवाडी पोलीस ठाण्यात जप्त साहित्य ठेवलेल्या स्टोअर रूममध्ये सोमवारी दुपारी सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. ती आग विझवताना एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा स्फोट कसा झाला याची पुष्टी पोलिसांनी अद्याप केलेली नाही.
मुंबईतील वांद्रे (पूर्व) परिसरातील खेरवाडी पोलीस ठाण्यातील एका खोलीत सोमवारी ही दुपारी ही घटना साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरविंद खोत यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यात ते गंभीर जखमी झाले त्याच्या सहकाऱ्यांनी त्याना सायन रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, जप्त केलेले साहित्य ठेवलेल्या स्टोअर रूममध्ये हा सिलेंडरचा स्फोट झाला. मात्र याला अधिकृत दुजोरा पोलिसांकडून देण्यात आलेला नाही. “आम्ही स्फोट कसा झाला हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही,” असे परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले.