Cyclone threat to Konkan coast including Raigad tomorrow! | Nisarga Cyclone: रायगडसह कोकण किनारपट्टीला उद्या चक्रीवादळाचा धोका!

Nisarga Cyclone: रायगडसह कोकण किनारपट्टीला उद्या चक्रीवादळाचा धोका!

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/अलिबाग/पालघर : अरबी समुद्रात मंगळवारी चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून ते रायगडच्या किनारपट्टीला श्रीवर्धन-हरिहरेश्वर येथे धडकेल असा अंदाज आहे. वादळाची तीव्रता लक्षात घेऊन मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीलगतच्या भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


त्याचवेळी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची आनंदवार्ता हवामान विभागाने दिली आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर किनापट्टी भागातील रेशनिंगच्या दुकानांसह कारखानेही बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. मच्छिमारांना गुरूवारपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्रातील बोटींना तटरक्षक दलाच्या मदतीने माघारी आणण्याचे काम सुरू आहे.


सध्याच्या कमी दाबाच्या पट्ट्याचे वादळात आणि पुढे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा धोका आहे. मात्र या बदलांमुळे महाराष्ट्रात मुंबईसह किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी विशेषत: ३ व ४ जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील वादळ ताशी १३ किमी वेगाने किनारपट्टीकडे सरकत आहे़ मंगळवारी सकाळी त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे़ त्यानंतर ते बुधवारी दुपारी ते रायगड जिल्ह्यातील हरीहरेश्वर आणि दमण दरम्यानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे़ यामुळे महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टींच्याजिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे़ पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यातही ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे़ मुंबईत अनेक ठिकाणी २ जूनलाही अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.


रायगड आणि दमण यामधील सुमारे २६० किमीच्या पट्ट्यामध्ये मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, पालघरचा समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने महाराष्ट्रात ९ तुकड्या तैनात केल्या आहेत. मुंबईत ३, पालघरमध्ये २, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एक तुकडी तैनात केली आहे.
दरम्यान सोमवारी दिवसभरात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व जोरदार सरी कोसळल्या. यवतमाळ २३, श्रीरामपूर ७१, वैजापूर ६७, गंगापूर ५१, पुणे लोहगाव ४१, औरंगाबाद १९ मिमी पावसाची नोंद झाली होती़

आपत्ती व्यवस्थापन सज्ज
वादळास तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग तयारीत आहे. वीज पुरवठा खंडित होणार नाही तसेच पालघर आणि रायगडमधील रासायनिक कारखाने, अणूउर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. एनडीआरएफच्या दहा तुकड्या तैनत करण्यात आल्या आहेत.


जूनमध्ये १२९ वषार्नंतर चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज
महाराष्ट्राच्या इतिहासात जूनमध्ये १२९ वर्षांनंतर चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीवर निर्माण होऊन धडकण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये १८९१ मध्ये पहिल्यांदा आणि त्यानंतर १९४८, १९८० मध्ये अशाप्रकारे े समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने चक्रीवादळ येईल अशी स्थितीही निर्माण झाली होती. मात्र, ती विरून गेली. यावेळी कमी दाबाचा पट्टा विरून जाणार की त्याचे वादळात रूपांतर होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Cyclone threat to Konkan coast including Raigad tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.