Join us

Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळाची चाहूल! मुंबईसह ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबईत सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 00:24 IST

Cyclone Tauktae: अरबी समुद्रातील तौत्के नावाचं चक्रीवादळ रविवारी मुंबई किनारपट्टीजवळून जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पण या चक्रीवादळाची चाहूल आजच पाहायला मिळत आहे.

Cyclone Tauktae: अरबी समुद्रातील तौत्के नावाचं चक्रीवादळ रविवारी मुंबई किनारपट्टीजवळून जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पण या चक्रीवादळाची चाहूल आजच पाहायला मिळत आहे. कारण मुंबईसह ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबईत सोसाट्याचा वारा सुरू झाला. यासोबतच अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत देखील झाला. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसालाही सुरुवात झाली आहे. 

मुंबई उपनगरात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. ठाण्यातही पावसानं हजेरी लावली असून वाऱ्याचा वेगही वाढला आहे. डोंबिवलीतही विजा चमकत असून काही ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडीत झाला आहे. अंबरनाथ, बदलापूरात वादळी वारा आणि तुफान पाऊस सुरू झाला. त्यात वीज गेल्यानं सारंकाही भयाण झालं. 

मुंबई उपनगरात अंधेरी, विलेपार्ले, कुर्ला या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. तर मुलुंडलाही पावसानं झोडपलं आहे. तौत्के चक्रीवादळामुळे रविवारी संध्याकाळी वाऱ्याचा वेग वाढून ताशी ६० किमीपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज याआधीच हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे महापालिकेनंही नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. तसेच चौपाट्या, समुद्र किनाऱ्या नजीकचा परिसर आदी ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये अशी सूचनाही केली आहे. 

टॅग्स :तौत्के चक्रीवादळचक्रीवादळमुंबई