Join us  

Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढला; दोन तास आधीच किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 9:26 AM

Cyclone Nisarga Updates: मुंबईसह किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात झाली आहे.

मुंबई: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्ट्यामुळे येणाऱ्या वादळाचं चक्रीवादळात रूपांतर होऊन ते महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ताशी १३ किलोमीटर वेगाने हे वादळ पुढे सरकत असून ते जमिनीवर धडकताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे.

राज्याच्या किनारपट्टीवर आज निसर्ग चक्रीवादळ धडकणार आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात झाली आहे. आज अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एनडीआरएफसह नौदलाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

कोकण किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढला असून ८५- ९५ ताशी वेगानं वारे वाहत आहे. साधारण हा वेग ११० किमीपर्यत जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अलिबागपासून १४० किलोमीटर अंतरावर आणि मुंबईपासून १९० किलोमीटर अंतरावर असणारं चक्रीवादळ दुपारी तीन ऐवजी एक वाजेपर्यंत धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रत्नागिरी किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचे आगमन झाले असून सध्या मोठ्या प्रमाणावर  जाेरदार पावसासह प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच वेगाने वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह खंडीत झाला आहे. 

'निसर्ग'ची तीव्रता 'अम्फन'इतकी नसेल असाही दिलासा देण्यात येत आहे. चक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानंतर साधारण चार तासांपर्यंत त्याचा परिणाम जाणवेल, असा अंदाज आहे. या काळामध्ये झोपड्या, कच्ची घरे यांना सर्वाधिक धोका आहे. या घरांचे छप्पर उडून जाऊ शकते, घरांवर टाकलेले पत्रेही उडून जाऊ शकतात. वीजपुरवठा, संवादाच्या सेवा खंडीत होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे

टॅग्स :निसर्ग चक्रीवादळमुंबईमहाराष्ट्र