Cyclone Nisarga: The municipal system will continue to function till the cyclone is completely removed; Information of Iqbal Chahal | Cyclone Nisarga: चक्रीवादळ पूर्ण ओसरेपर्यंत महापालिकेची यंत्रणा अखंड कार्यरत राहणार; इकबाल चहल यांची माहिती

Cyclone Nisarga: चक्रीवादळ पूर्ण ओसरेपर्यंत महापालिकेची यंत्रणा अखंड कार्यरत राहणार; इकबाल चहल यांची माहिती

मुंबई: निसर्ग चक्रीवादळाचा धोका पूर्णपणे निवळत नाही तोपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा या आपत्तीचा सामना करण्यासाठी अखंड कार्यरत आहे. गरज नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला महापालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी आज (बुधवारी) सकाळी भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली तसेच समन्वयाचे कामकाज कसे सुरु आहे, याचा आढावा घेतला. 

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आयुक्त चहल यांनी सांगितले की, सुमारे १२९ वर्षांनंतर मुंबई महानगरावर चक्रीवादळाचे संकट आले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत हे वादळ धडकण्याचा अंदाज आहे. त्याच्या तीव्रतेचा वर्तवलेला अंदाज लक्षात घेऊन सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून वादळाची तीव्रता कायम राहील, असे गृहीत धरुनच कामकाज करण्यात येत आहे. 

वादळाची तीव्रता कमी होत आहे किंवा कसे, याचा अंदाज सातत्याने अद्ययावत होत असला तरी नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन वादळ पूर्णपणे ओसरेपर्यंत प्रशासन त्याअनुषंगाने कार्यरत राहील. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनीदेखील नागरिकांना घराबाहेर पडू नये, सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन केले आहे. मुंबईकरांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे आयुक्तांनी नमूद केले. 

चक्रीवादळाच्या संभाव्य पार्श्वभूमीवर समुद्र किनारी व संभाव्य धोका असलेल्या मुंबईतील विविध भागांतून आतापर्यंत सुमारे २० ते २५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तर सुमारे ३० हजार नागरिकांनी महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वत: स्थलांतर केले आहे. नागरिकांनी स्थलांतर करावे म्हणून जागोजागी आवाहन करण्यात येत आहे. स्थलांतरीत नागरिकांसाठी निवाऱयासह जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. चक्रीवादळ ओसरल्यानंतर घरी परतण्यापूवी या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत. दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांवरुन देखील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे. 

ओडिसा सरकारला वादळाशी संबंधित विविध आपत्तींचा सामना करण्याचा असलेला अनुभव लक्षात घेता, त्यांच्याशी देखील प्रशासनाने सल्लामसलत केली आहे. अशा आपत्तींमध्ये रस्त्यांवर कोसळलेली झाडे तातडीने हटविणे आवश्यक आहे अन्यथा मदतकार्यावर परिणाम होऊ शकतो, हा सल्ला लक्षात घेऊन महानगरपालिकेसह इतर यंत्रणांना देखील या कामामध्ये गरज पडल्यास सहकार्य करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची विनंती करण्यात आली आहे. त्या कर्मचाऱयांच्या कामकाजाचा व संयंत्रांचा खर्च महानगरपालिकेच्यावतीने देण्यात येईल. 

आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत शहर विभागात १२, पूर्व उपनगरात ७ तर पश्चिम उपनगरात १८ अशा एकूण ३७ ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. ही झाडे हलविण्याचे काम करण्यात आले असून या घटनांमध्ये कोणीही जखमी नाही. जोरदार पावसामुळे पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणी उपसा करण्यासाठी पंप उपलब्ध आहेत. या आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व अतिरिक्त महापालिका आयुक्त आपल्या परिमंडळांमध्ये कार्यरत असून सहाय्यक आयुक्तांसह संबंधित सर्व अधिकाऱयांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत रहावे, अशा सूचना यापूर्वीच सर्वांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे प्रत्यक्ष यंत्रणा कामकाज करीत असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

वांद्रे-कुर्ला संकुल येथे एमएमआरडीए मैदानावर उभारलेल्या समर्पित कोविड आरोग्य केंद्र जम्बो फॅसिलिटीमध्ये असलेल्या २१२ रुग्णांना वरळी येथील एनएससीआय कोविड जम्बो फॅसिलिटीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. बीकेसीतील कोविड केंद्र हे सुमारे १०५ किमी प्रतितास वेगाच्या वाऱ्याचा सामना करु शकते. मात्र चक्रीवादळात १२० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज असल्याने कोणताही धोका पत्करायचा नाही, म्हणून या रूग्णांना वरळी येथे स्थलांतरित केले आहे, अशी माहितीदेखील आयुक्त श्री. चहल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली. या भेटीनंतर आयुक्त चहल हे विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी रवाना झाले.

यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, सह आयुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन व सामान्य प्रशासन) मिलीन सावंत, उपआयुक्त (महापालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सल्लागार (आपत्कालीन व्यवस्थापन)  महेश नार्वेकर हे उपस्थित होते. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Cyclone Nisarga: The municipal system will continue to function till the cyclone is completely removed; Information of Iqbal Chahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.