Join us  

वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आता सायकल ट्रॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 6:30 PM

Cycle tracks : बोरिवलीकरांसाठी आगळी वेगळी संकल्पना

मनोहर कुंभेजकर

मुंबई : शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी व शारीरिक व्यायामासाठी उद्यानामध्ये आता सायकल ट्रेनिंग ट्रॅक बनविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे याची सुरुवात बोरिवलीतील आय.सी. कॉलनी झेन गार्डन येथून केली जाणार आहे. 

बोरिवलीकरांसाठी ही आगळी वेगळी संकल्पना शिवसेनेचे माजी  नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर राबवणार आहेत. शहरात वाहनांमुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी तसेच शारीरिक व्यायाम म्हणून सायकलिंग हा एक उत्तम पर्याय असून घोसाळकर यांच्या या उपक्रमाचे पर्यावरण प्रेमी नागरिकांनी स्वागत केले आहे. 

सायकल मेयर ऑफ मुंबई फिरोझा सुरेश व स्मार्ट कम्युट फौंडेशनतर्फे आज आय. सी. कॉलनी येथील झेन गार्डन परिसरात 'सायकल चलाव सिटी बचाव' हे सायकलिंग अभियान राबविण्यात आले.याप्रसंगी अभिषेक घोसाळकर, हॅन्सल परेरा,फिरोझा सुरेश, मनोज नायर व राकेश देसाई सहित अनेक सायकलस्वार उपस्थित होते. 

उद्यानातील सायकल स्टँड व ट्रक या उपक्रमाचे आज बोरिवलीकरांनी स्वागत केले. मुंबईतील प्रत्येक प्रभागात पालक तसेच मुलांसाठी सायकल ट्रॅक बनवण्याची संकल्पना सायकल कोन्सिलर मनोज नायर यांनी मांडली होती. त्यास अभिषेक घोसाळकर यांनी त्यास तात्काळ होकार दिला. त्यानुसार प्रभाग क्रमांक 1 मधून या उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे.

दहिसर प्रभाग 1 मधील झेन गार्डन आणि इतर उद्यानाजवळ आता सायकल ट्रक व स्टँड बनविण्यात येणार आहे. तसेच प्रमिला नगर जवळील दहिसर नदी येथील पुलाच्या समांतर रस्त्यावर सायकल ट्रॅक बनविण्यात येणार आहे.शहरातील लोकांना मोटारी वापरण्याऐवजी जवळच्या  प्रवासासाठी सायकली वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असे घोसाळकर यांनी सांगितले.

दरम्यान प्रभाग क्रमांक 1 च्या शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी मुंबई महापालिकेत ठराव सूचना अंतर्गत शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी रेल्वे स्थानक, मेट्रो स्थानक,शाळा, महाविद्यालय, मॉल,थिएटर,पालिका प्रभाग कार्यालय तसेच इतर प्रमुख कार्यालयात सायकल स्टँड बनविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे शहरातील दुचाकी वाहने कमी होऊन सायकलला प्रोत्साहन मिळेल असे घोसाळकर यांनी सांगितले. 

टॅग्स :पर्यावरणमुंबईहवामानबोरिवली