लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नवी मुंबईच्या महापे येथे अत्याधुनिक सायबर सुरक्षा केंद्र उभारले जात आहे. येथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड आधारित प्रणालींचा वापर केला जाणार आहे. राज्यातील ५० सायबर पोलिस ठाणे या प्रणालीशी जोडले जाणार असून, सायबर फसवणूक झाल्यास त्वरित कारवाई करता येणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
विधानपरिषदेत आ.मिलिंद नार्वेकर, आ.सुनील शिंदे आदी सदस्यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री कदम म्हणाले, सायबर गुन्ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने सायबर सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी ८५० कोटींचा निधी देण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्ह्यांना वेळीच रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.