मुंबईत सायबर भामट्यांचा तिघांना तीन कोटींचा गंडा, सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्यासह तिघांची फसवणूक; तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 06:57 IST2025-01-04T06:56:57+5:302025-01-04T06:57:10+5:30
तक्रारदार महिला २०११ मध्ये प्राप्तीकर विभागातून निवृत्त झाल्या असून सध्या त्या गोरेगाव येथे कुटुंबियांसोबत राहतात...

मुंबईत सायबर भामट्यांचा तिघांना तीन कोटींचा गंडा, सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्यासह तिघांची फसवणूक; तपास सुरू
मुंबई : डिजिटल अरेस्टच्या, शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. प्राप्तीकर विभागातून सेवानिवृत्त झालेल्या ७४ वर्षीय महिलेसह तिघांना तीन कोटीहून अधिक रुपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उत्तर प्रादेशिक सायबर विभाग अधिक तपास करत आहे.
तक्रारदार महिला २०११ मध्ये प्राप्तीकर विभागातून निवृत्त झाल्या असून सध्या त्या गोरेगाव येथे कुटुंबियांसोबत राहतात. १२ नोव्हेंबरला त्यांना अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. त्याने आपण क्रेडिटकार्ड विभागातून बोलत असून तुमच्या क्रेडिटकार्डवर अडीच लाख रुपये थकीत असल्याचे त्यांना सांगितले. याबाबत बंगळुरू येथे याचिका दाखल असून तुम्हाला तेथे यावे लागेल, असे त्या व्यक्तीने सांगितले.
महिलेने नकार देताच त्यांना बंगळुरू सिटी पोलिस कॉल करतील सांगून फोन ठेवला. त्यानंतर, त्यांना बंगळुरू सीटी पोलिसांच्या नावाने एक व्हिडिओ कॉल आला. त्याने तुमच्या खात्यातून दोन कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगितले. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही क्षणी अटक होईल, अशी भीती तक्रारदार महिलेला घालण्यात आली. त्यांच्या बँक खात्यातून आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर २५ लाख रुपये ट्रान्सफर केले.
ट्रेडिंग ॲपवर गुंतवणूक
तिसऱ्या प्रकरणात नामांकित फायनान्स कंपनीचे नाव वापरून सायबर भामट्यांनी शेअर ट्रेडिंग करणाऱ्या, चिकित्सक तरुणाला तब्बल दीड कोटींचा गंडवले आहे. अवघ्या तीन आठवड्यांत १.५३ कोटी रुपये फसव्या ट्रेडिंग ॲपवर गुंतवले. त्यातून सहा कोटी नफा झाल्याचे ॲपवर दिसत होते. याप्रकरणी सायबर विभाग अधिक तपास करत आहे.
भामट्यांची भीती
दुसऱ्या प्रकरणात फसवणूक झालेल्या पहिल्या तक्रारदार सेवानिवृत्त प्राध्यापक असून त्यांचे पती आयकर विभागात सहआयुक्त म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या मुलाला भामट्यांनी लक्ष्य केले. त्यांच्या मुलाला आर्थिक गैरव्यवहारांत अटक होईल, अशी भीती घालत भामट्यांनी काही कागदपत्रे पाठवली. नाव, आधार क्रमांक असल्याने व्हॉट्सॲप, स्काईपद्वारे संवाद साधणारे पोलीसच आहेत यावर विश्वास बसला. भामट्यांनी त्याला त्याच्या, आईच्या, मृत वडलांच्या बँक खात्यांवरील जमा, एफडी व म्युच्युअल फंड आदी गुंतवणूक मोडून एकूण १.६४ कोटी रुपये खात्यांवर पाठवण्यास भाग पाडले.