सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 06:02 IST2025-09-15T06:01:12+5:302025-09-15T06:02:58+5:30
दुसऱ्या दिवशी दुपारी पगार जमा झाला का? हे पाहण्यासाठी तक्रारदार यांनी बँक खाते तपासले असता पगार खात्यात जमा झाला होता. पण, खात्यात अवघे ८६ रुपये शिल्लक असल्याचे दिसले.

सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
मुंबई : सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकलेल्या बेस्टच्या ५० वर्षीय वाहकाच्या खात्यातील ७ लाख रुपयांवर डल्ला मारत केवळ ८६ रुपये शिल्लक राहिल्याचे समोर आले. याप्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार १३ ऑगस्टला नियोजन कार्यालयात असताना त्यांना अनोळखी मोबाईल नंबरवरून कॉल आला. समोरील व्यक्तीने तो बँक ऑफ इंडियाचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगून तक्रारदार यांना त्यांच्या बँक ऑफ इंडियामधील बँक खात्याची केवायसी अपडेट नाही, ती अपडेट करण्यासाठी कॉल करून, त्या व्यक्तीने मोबाईलवर आलेला ओटीपी द्या, असे सांगितले. तक्रारदाराने त्याला ओटीपी देण्यास नकार देत स्वतः केवायसी अपडेट करेन, असे सांगितले. कॉल करणाऱ्या सायबर ठगाने त्यांना बोलण्यात गुंतवून व्हॉट्सॲपवर लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगितले. तक्रारदार यांनी मोबाईलवर बँकेच्या नावाने आलेल्या ॲपची लिंक क्लिक केली. त्यांच्या मोबाईलमध्ये बँकचे ॲप दिसू लागले. कॉलरने तक्रारदार यांना जन्मतारीख, मोबाईल क्रमांक अशी वैयक्तिक माहिती भरण्यास भाग पाडले. त्यानंतर ठगाने तक्रारदार यांच्या बँक खात्यातून ९ व्यवहार करत एकूण ६ लाख ८३ हजार ६९९ रुपये लंपास केले. दुसऱ्या दिवशी दुपारी पगार जमा झाला का? हे पाहण्यासाठी तक्रारदार यांनी बँक खाते तपासले असता पगार खात्यात जमा झाला होता. पण, खात्यात अवघे ८६ रुपये शिल्लक असल्याचे दिसले.
अखेर तक्रार नोंदवली
सायबर फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने त्यांनी तक्रार नोंदविण्याकरिता सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० यावर बऱ्याचवेळा फोन केला. पण, फोन लागत नसल्याने आणि व्यस्त येत असल्याने त्यांनी बांद्रा येथील सायबर क्राईम येथे कार्यालयात जात तक्रार नोंदवली. त्यानंतर त्यांनी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.