सीएसएमटीची हेरिटेज इमारत चकाकणार; सँड पॉलिशिंगची प्रक्रिया सुरू, काळपट डाग हटवण्यासाठी मध्य रेल्वेकडून अवलंब
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:24 IST2026-03-11T13:23:54+5:302026-03-11T13:24:54+5:30
मुंबईत वाहनांमुळे होणारे प्रदूषण, धूर आणि धूळ, यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) हेरिटेज इमारतीला काळसर डाग पडत आहेत.

सीएसएमटीची हेरिटेज इमारत चकाकणार; सँड पॉलिशिंगची प्रक्रिया सुरू, काळपट डाग हटवण्यासाठी मध्य रेल्वेकडून अवलंब
मुंबई : मुंबईत वाहनांमुळे होणारे प्रदूषण, धूर आणि धूळ, यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) हेरिटेज इमारतीला काळसर डाग पडत आहेत. त्यामुळे इमारतीच्या सौंदर्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने सँड क्लीनिंग (वाळूने स्वच्छता) पद्धतीद्वारे इमारतीची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. ही वर्षभर चालणारी प्रक्रिया असून, आता मुख्य इमारतीच्या स्वच्छतेचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाहनांच्या धुराचा थर
सीएसएमटी हे केवळ रेल्वे स्थानक नसून, गोथिक स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे.
१८८८ साली बांधलेली ही इमारत युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये स्थान मिळवणारी भारतातील मोजक्या इमारतींपैकी एक आहे.
दिवस-रात्र होणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे निर्माण होणारा धूर आणि प्रदूषण यामुळे या वारसा इमारतीच्या भिंतींवर काळ्या धुराचा थर साचतो.
परिणामी, इमारतीचे सौंदर्य मळकट दिसू लागते. अशा परिस्थितीत मध्य रेल्वेने दरवर्षी सँड क्लीनिंग पद्धतीने स्वच्छता व देखभाल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
प्रक्रियेची वैशिष्ट्ये...
नियंत्रित हवेच्या दाबाने पाणी आणि वाळूचा फवारा केला जातो.
इमारतीवरील काळपट डाग आणि प्रदूषण हटवले जाते.
वारसा इमारतीच्या मूळ रंगांना कोणतीही हानी पोहोचत नाही.
पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब होतो.
सँड क्लीनिंग म्हणजे काय?
सँड क्लीनिंग पद्धत म्हणजे वाळू आणि पाण्याच्या मिश्रणाचे नियंत्रित दाबाने इमारतीच्या भिंतींवर साचलेला प्रदूषणाचा थर दूर करणे.
रसायनांचा वापर टाळून ही प्रक्रिया केली जाते, त्यामुळे इमारतीच्या स्थापत्यशैलीवर कोणताही परिणाम होत नाही. यासाठी कुशल कंत्राटदारांची नेमणूक केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सँड क्लीनिंग पद्धतीमुळे इमारतीचे मूळ रूप पुन्हा दिसेल. याशिवाय, इमारतीच्या दगडी भिंतींवर असलेल्या कलाकृतींना प्रदूषणाचा धोका कमी होत असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही एक ऐतिहासिक वारसा लाभलेली इमारत आहे. या इमारतीची स्वच्छता ही वेळोवेळी गरजेनुसार केली जाते. ही कामे करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार काही संस्थांना मंजुरी दिली देण्यात आली आहे. अशा संस्थांपैकी एका संस्थेकडून ही सफाई करून घेण्यात येत आहे.
डॉ. स्वप्निल नीला,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे