Aryan Khan Drug Case: मी तुम्हाला शब्द देतो, तुरुंगातून बाहेर पडल्यावर...; आर्यनचं समीर वानखेडेंना वचन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 06:44 IST2021-10-17T06:42:19+5:302021-10-17T06:44:42+5:30
Aryan Khan Drug Case: नसीबीचे अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांकडून आर्यनचे समुपदेशन

Aryan Khan Drug Case: मी तुम्हाला शब्द देतो, तुरुंगातून बाहेर पडल्यावर...; आर्यनचं समीर वानखेडेंना वचन
मुंबई : एनसीबीची कार्डेलिया क्रूझवर ‘स्टारकिड’ आर्यन खान याच्यावरील कारवाई आणि त्याला जामीन मिळणार की नाही, याबद्दल देशभर चर्चा सुरू असताना स्वतः आर्यन मात्र यापुढे व्यसनापासून दूर राहून जबाबदार नागरिक बनण्याची ग्वाही अधिकाऱ्यांना देत आहे. एनसीबीचे अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांकडून त्याचे समुपदेशन करण्यात येत आहे.
आर्यन व क्रूझवर अटक केलेल्या ७ जणांवर दोन एनजीओ आणि अधिकाऱ्यांकडून एनसीबीचे कार्यालय आणि आर्थर रोड तुरुंगात जाऊन समुपदेशन करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
आर्यनसह सातही जण ३० वर्षांच्या आतील आहेत. त्यांना ड्रग्जच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी ‘एनजीओ’तर्फे मदत करण्यात येत आहे. या तरुणांना समीर वानखेडे यांच्यासह अन्य अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून त्याचे दुष्परिणाम, देशाच्या हानीबद्दल माहिती देऊन त्यापासून परावृत्त केले जात आहे. हा एनसीबीच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. समुपदेशनाला आर्यन खान सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
‘गरिबांच्या कल्याणासाठी काम करू’
आर्यन खान हा प्रत्येक अधिकाऱ्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतो, त्यांच्या सूचनांचे पालन करून आपण यापुढे व्यसनापासून दूर राहू, समाजातील गरीब, वंचित घटकांच्या मदतीसाठी कार्यरत राहू, असे आश्वासन त्याने अधिकाऱ्यांना दिले आहे.