दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात तुफान गर्दी; आकाश कंदील, विद्युत दिव्यांची रेलचेल, दादर, परळमधील बाजारपेठांना लाभली नवी झळाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 11:16 IST2025-10-13T11:15:52+5:302025-10-13T11:16:15+5:30
दिवाळीपूर्वीचा हा शेवटचा रविवार असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी लहानग्यांसह गर्दी केल्याने संपूर्ण बाजारपेठ मोठ्या प्रमाणात गजबजली होती.

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात तुफान गर्दी; आकाश कंदील, विद्युत दिव्यांची रेलचेल, दादर, परळमधील बाजारपेठांना लाभली नवी झळाली
मुंबई : धनत्रयोदशी या वर्षी शनिवारी म्हणजेच १८ ऑक्टोबरला असल्याने दिवाळीच्या तयारीला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांचा खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला असल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी, १२ ऑक्टोबरला दादर, परळ, मस्जिद बंदर, क्राॅफर्ड मार्केट आणि मुंबईतील आसपासच्या बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. दिवाळीपूर्वीचा हा शेवटचा रविवार असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी लहानग्यांसह गर्दी केल्याने संपूर्ण बाजारपेठ मोठ्या प्रमाणात गजबजली होती.
दिवाळीसाठी कपडे, भेटवस्तू, तोरण, कंदील, रांगोळी साहित्य, फराळाचे सामान या सर्व वस्तूंवर खरेदीदारांची विशेष लगबग दिसली. महिलांनी चकली, करंजी, लाडू, शंकरपाळी यांसारख्या पारंपरिक पदार्थांसाठी लागणारे साहित्य विकत घेतले, तर सजावटीसाठी कंदील, फुलांची माळ, दिवे, पणत्या आणि रंगीत लाईट्सची खरेदी केली. लहान मुलांचा उत्साहही काही कमी नव्हता. अनेकांनी पालकांसोबत फटाके खरेदी करताना दुकानदारांकडून नवीन प्रकारचे फटाके आणि सुरक्षित वापराविषयी माहिती घेतली.
वाहतूक पोलिसांना या गर्दीचा ताण जाणवला असून, दादर आणि क्राॅफर्ड मार्केट परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त पाहायला मिळाला. संध्याकाळी उशिरापर्यंत खरेदीचा उत्साह ओसरण्याचे नाव घेत नव्हता. दिवाळी जवळ आल्याने शहरातील वातावरणात सणासुदीची रंगत जाणवू लागली आहे. दुकानदारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य दोन्हीकडचा उत्साह बाजारपेठेत फुलला होता.
जीएसटी कपात झाली तरी अजूनही जुनेच दर
२२ सप्टेंबरपासून जीएसटी कपात जाहीर झाली असली तरी अनेक दुकानांमध्ये अजूनही जुन्या दरानेच सामान विक्री होत असल्याचे चित्र होते. त्यामुळे गृहिणींना अपेक्षित फायदा मिळाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर दुकानदारांच्या मते अजूनही आमचे जुने खरेदी केलेले सामान संपलेले नसल्याने दिवाळीत ते संपण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर नव्या दराचे सामान दुकानांमध्ये उपलब्ध होईल.
दिवाळी अगदी ५ दिवसांवर आली असून अजून फराळ बाकी आहे. मुलांना कपडे, फटाके देखील घ्यायचे आहेत. आज खरेदी केली तर सर्व लवकर आवरून दिवाळी आनंदात साजरी करता येईल.
मीना पार्टे, गृहिणी
आज आम्हाला श्वास घ्यायला वेळ नाही. शेवटचा रविवार असल्याने इतर दिवसांच्या तुलनेत आज गर्दी जास्त आहे. यानंतरदेखील गर्दी असेल, पण ती कमी प्रमाणात असेल. नागरिकांमध्ये देखील खरेदीचा उत्साह आहे.
रोहित जोशी, दुकानदार