'मुंबई सेंट्रल'ला स्क्रॅप केलेल्या गाड्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2025 12:19 IST2025-03-03T12:18:51+5:302025-03-03T12:19:08+5:30
सुरक्षा व्यवस्थेकडून सतर्कता बाळगली जात असल्याचा दावा सुरक्षा अधिकाऱ्यांनी केला आहे.

'मुंबई सेंट्रल'ला स्क्रॅप केलेल्या गाड्यांची गर्दी
सुरेश ठमके, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता मुंबईतील जून्या आणि मोठ्या मुंबई सेंट्रल एसटी डेपोतील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डेपोत एका बाजूला अंधाराचे साम्राज्य असून याठिकाणी दुरुस्तीच्या आणि स्क्रैप केलेल्या गाड्या उभ्या असल्याने गैरकृत्यांची शक्यता आहे. मात्र, सुरक्षा व्यवस्थेकडून सतर्कता बाळगली जात असल्याचा दावा सुरक्षा अधिकाऱ्यांनी केला आहे.
मुंबई सेंट्रल बसस्थानक एसटी गाड्यांचे प्रमुख आगार आहे. या डेपोत रोज पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात सुमारे अडीचशे ते ३०० गाड्या ये-जा करतात. त्यामुळे या डेपोमध्ये नेहमीच गर्दी असते. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत गाड्या सुटत असल्याने या स्थानकात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. येथे डागडुजीचे काम सुरू असल्याने गाड्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. डेपोत भिकारी आणि गर्दुल्ले यांचाही वावर बऱ्यापैकी असतो; मात्र येथील सुरक्षारक्षक योग्य ती खबरदारी घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशी घेतली जाते खबरदारी
या एसटी डेपोत १९ सुरक्षारक्षक आहेत. मात्र सध्या प्रत्येक शिफ्टमध्ये चार याप्रमाणे १६ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. वास्तविक या १६ सुरक्षारक्षकांपैकी काही कमी करण्याचा प्रशासनाचा मानस होता; मात्र स्वारगेटच्या घटनेनंतर रिक्त असलेली तीन पदे भरण्याबाबतही विचार सुरू असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. चार प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
'या' गाड्या कुठे उभ्या करायच्या?
दरम्यान, एसटी डेपोमध्ये १५ ते २० गाड्या या दुरुस्तीसाठीच्या किंवा स्क्रैप केलेल्या आहेत. या गाड्यांमुळेच मुख्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असला तरी या गाड्या कुठे उभ्या करायच्या हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे या गाड्यांसाठी आम्ही एक सुरक्षारक्षक तैनात केला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, या गाड्या ज्या परिसरात उभ्या करण्यात आल्या आहेत तिथे पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे.