‘न्यू इंडिया’ बँकेबाहेर खातेदारांची गर्दी; कष्टाची कमाई बँकेत अडकली, ठेवीदारांमध्ये चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 05:32 IST2025-02-15T05:31:36+5:302025-02-15T05:32:04+5:30
ठेवीदारांबरोबरच या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोने-दागिने, कागदपत्रे तरी सुरक्षित आहेत की नाहीत, या चिंतेने अनेकजण आले होते.

‘न्यू इंडिया’ बँकेबाहेर खातेदारांची गर्दी; कष्टाची कमाई बँकेत अडकली, ठेवीदारांमध्ये चिंता
अमर शैला
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर गुरुवारी निर्बंध लादल्याने घाबरलेल्या ठेवीदारांनी शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील शाखांवर धडक दिली. त्यातून बँकेच्या मुंबईतील शाखांबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आयुष्यभर जमा केलेली जमा-पुंजी परत मिळणार की नाही? या चिंतेत ठेवीदार आहेत.
बँकेवर निर्बंध आणल्याची बातमी शुक्रवारी सकाळी ठेवीदारांमध्ये समाज माध्यमातून वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर या बँकेच्या मुंबईतील कांदिवली, अंधेरी आदी भागातील तसेच देशभरातील मिळून २८ शाखांबाहेर ठेवीदारांनी एकच गर्दी केली होती. कष्टकऱ्यांपासून ते व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकही आपल्या ठेवी सुरक्षित आहेत की नाहीत, या चिंतेत बँकेच्या प्रवेशद्वारावर दाखल झाले होते.
पाेलिस बंदाेबस्त तैनात
कष्टाची कमाई असली तरी ऐन गरजेच्या वेळी हाती काहीच मिळणार नसल्याने सगळ्यांना काळजीने घेरले होते. मुलांच्या शाळा-कॉलेजच्या फीपासून ते कर्जाचे हप्ते आणि घरांचे भाडे कसे भरायचे, अशी चिंता हे ठेवीदार मांडताना दिसत होते. अंधेरी पूर्वेकडील सहार रस्त्यावरील बँकेच्या शाखेबाहेर सकाळी १० वाजता बँक उघडण्याच्या आधीपासूनच ठेवीदार दाखल झाले होते. ठेवीदारांची संख्या मोठी असल्याने अखेर बँकेच्या शाखेबाहेर पोलिसांचाही बंदोबस्त तैनात होता.
दरम्यान, ठेवीदारांबरोबरच या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोने-दागिने, कागदपत्रे तरी सुरक्षित आहेत की नाहीत, या चिंतेने अनेकजण आले होते. लॉकरमधील सर्व वस्तू काढण्यासाठी सकाळी १० वाजल्यापासूनच लोक जमा झाले होते. सायंकाळी ४ वाजेपर्यंत त्यांची रांग होते. बहुतांश लोकांनी लॉकरमधून त्यांचे सर्व साहित्य परत घेत घरी नेले.
मोठ्या ठेवीदारांच्या शोधात अन्य बँकांचे कर्मचारी
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध आणल्याच्या पार्श्वभूमीवर या बँकेच्या ग्राहकांनी शाखांबाहेर गर्दी केली होती. ही संधी हेरून प्रतिस्पर्धी बँकांचे कर्मचारी आपल्याला बडे ठेवीदार ग्राहक मिळतील, या अपेक्षेने या बँकेच्या प्रवेशद्वारावर दाखल झाले होते. हे कर्मचारी त्यांची बँक कशी सुरक्षित असून, त्यांच्यामध्ये खाते उघडणे कसे हिताचे आहे, याचा प्रचार या ग्राहकांमध्ये करत होते.
बँकेने लावले बॅनर
आरबीआयने बँकेवर लादलेले निर्बंध हे ठेवीदारांच्या हिताचे आहेत, असे बॅनर बँकेने शाखेबाहेर लावले होते. तसेच ठेवीदारांची ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम विम्याद्वारे संरक्षित असून, ती ९० दिवसांमध्ये अदा करणे अपेक्षित आहे. तोपर्यंत ठेवीदारांनी संयम ठेवावा, अशी विनंती बँकेकडून करण्यात आली होती.