मुंबई - ईमेल हॅक करत एका मीठ उत्पादक कंपनीच्या तीन बँक खात्यांतून १ कोटी १४ लाख ५८ हजार रुपये गायब झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सायबर (मध्य विभाग) पोलिसांत अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
माटुंगा परिसरात राहणारे मीठ उत्पादक सिद्धार्थ किशोर छेडा (३७) यांच्या तक्रारीनुसार, ते मीठ उत्पादन करून विक्री करण्याचा व्यवसाय गुजरात आणि माटुंगा परिसरात करतात. या व्यवसायासाठी तीन कंपन्या स्थापन केलेल्या असून, त्यांच्या आर्थिक व्यवहारासाठी तीन बँक खात्यांचा वापर करण्यात येत होता. कंपनीच्या माटुंगा येथील कार्यालयात खरेदी-विक्रीबाबतच्या व्यवहारांच्या नोंदी ठेवल्या जातात. त्यासाठी कंपनीत स्वाती शितप या सिनीअर अकाउंटंट म्हणून काम पाहतात. तिन्ही कंपनीचे आर्थिक व्यवहार हे नेटबँकिंगमार्फत होत असून, त्यासाठी कंपनीचे वेगवेगळे लॉगइन आयडी आहेत. २१ जानेवारी रोजी स्वाती हिने सांगितले, सिद्धार्थ सॉल्ट अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे व्यवहार करण्यासाठी नेटबँकिंगचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ते चुकीचे दाखवत असल्याचे सांगितले. त्यांनी नवीन पासवर्डद्वारे बँक खात्याच्या नेटबँकिंगमध्ये प्रवेश करताच, १९ जानेवारी रोजी ४९ लाख ९४ हजार ७७९ रुपये बँक खात्यात वळते केल्याचे दिसून आले.
अन्य दोन बँक खाती तपासताच त्यातही अडचणी आल्याचे दिसून आले. त्यानुसार, तिन्ही बँक खाती फ्रिज केली. चौकशीत तिन्ही बँक खात्यांतून एकूण १ कोटी १४ लाख ५८ हजार ७२९ रुपयांवर सायबर भामट्याने डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले.