मुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यांत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांतील १९५ तालुक्यांमध्ये तब्बल १७ लाख ८५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर (४२ लाख ८४ हजार ८४६ एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. त्यात प्रामुख्याने खरीप शेतपिकांचे नुकसान झाले असून सोयाबीन, मका, कापूस, उडिद, तूर, मूग, भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे.
ऑगस्टमधील अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली आहे.
या जिल्ह्यांतही नुकसान : हिंगोली, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे.
सरकार तातडीने मदत करणार : मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात चार दिवसांत ७४ मंडळांत अतिवृष्टी झाली. तीन महिन्यांत १६ लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, १५ लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. १०५ टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य ध्वजारोहणाप्रसंगी सरकार अतिवृष्टीग्रस्त भागात तातडीने मदत करेल, असे जाहीर केले.
मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यात आपले अनेक बांधव दगावले आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वांना राज्य सरकार तत्काळ मदत देईल.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री