Join us  

मुंबईतील सेना भवनाजवळ राडा, शिवसेनेच्या माजी महापौरांसह 7 जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 3:35 PM

भाजपच्या आंदोलनाची कुणकूण लागल्याने स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी सेना भवन परिसरात गर्दी केली होती.

ठळक मुद्देआमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्या सांगण्यावरून आपल्यावर हल्ला करण्यात आला," असा आरोपही तेंडुलकर यांनी केला आहे.

मुंबई - अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठीच्या जमीन खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून बुधवारी शिवसेना (shiv sena) भवन परिसरात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी आंदोलक भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाली. काही छायाचित्रकारांवरही हल्ला झाला. त्यानंतरही काही काळ या भागात तणावाचे वातावरण होते. आता, याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरुन गुन्हा दाखल झाला आहे. तर, शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भाजपच्या आंदोलनाची कुणकूण लागल्याने स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी सेना भवन परिसरात गर्दी केली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वातावरण काहीसे निवळले. मात्र, काही वेळातच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत शिवसैनिकांची बाचाबाची सुरू झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. महिला कार्यकर्त्यांनाही शिवीगाळ आणि मारहाण झाल्याने वातावरण तापले. यावेळी मारहाण करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

एका महिलेवर हात उचलला, ही शिवसेना नव्हे, ही तर गुंडा सेना आहे. आमच्या युवा मोर्चाच्या लोकांनी आंदोलन केले. आम्ही गाडीने जात होतो तेवढ्यात शिवसेनेचे लोक आम्हाला मारायला लागले. आम्हीही दादरकर आहोत. दादर यांच्या बापाचे आहे का?, शिवसेना आता खिल्जीसेना बनली आहे. यांना हिंदुत्वाचं काही पडलेले नाही, असा आरोप भाजपच्या माहीम विधानसभेच्या अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनी केला. 

त्या म्हणाल्या, "आंदोलन संपल्यानंतर आम्ही गाडी काढण्यासाठी गेलो असताना शिवसैनिकांनी मागून हल्ला केला. आम्हाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्या सांगण्यावरून आपल्यावर हल्ला करण्यात आला," असा आरोपही तेंडुलकर यांनी केला आहे.

दोन गुन्हे दाखल 

मारहाणीप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात जमावबंदीचा नियम मोडून मोर्चा काढल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सात शिवसैनिकांविरोधात मारहाण, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यात माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू जगडे, राकेश देशमुख, शशी पुडने यांचा समावेश आहे.  

टॅग्स :गुन्हेगारीशिवसेनाभाजपामुंबई