Join us

वृद्धाला क्रेडिट कार्डचे आमिष; सव्वाचार लाखांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:55 IST

मुंबई : खार परिसरात जोसेफ जॉर्ज (वय ६७) यांना क्रेडिट कार्ड देण्याच्या आमिषाने त्यांच्याकडून चार लाख २७ हजार रुपये ...

मुंबई : खार परिसरात जोसेफ जॉर्ज (वय ६७) यांना क्रेडिट कार्ड देण्याच्या आमिषाने त्यांच्याकडून चार लाख २७ हजार रुपये उकळले. हा प्रकार ३० जुलै रोजी घडला. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

जॉर्ज यांना ३० जुलैला सकाळी अनोळखी व्यक्तीने फोन करत तो एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड शाखेतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच तुम्ही क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी अर्ज केला असून, तुमचे वय जास्त असल्याने ते मिळण्यासाठी तुम्हाला दोन लाख रुपये बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करावे लागतील, असेही म्हणाला. हे पैसे भरताना तुम्हाला जो ओटीपी येईल तो मला शेअर करा, असे या व्यक्तीने सांगितल्याने जॉर्ज यांनी त्याला ओटीपी दिला. 

त्यानंतर प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे दोन लाख त्यांच्या खात्यातून डेबिट झाले. हे पैसे क्रेडिट कार्डसाठी लागणाऱ्या फिक्स डिपॉझिटच्या रकमेचा भाग असावे, असे त्यांना वाटले. मात्र या व्यक्तीने जॉर्ज यांच्या पत्नीलाही क्रेडिट कार्ड देतो असे सांगत पुन्हा अशीच प्रक्रिया करत दांपत्याकडून ४ लाख २७ हजार रुपये उकळले. त्यानंतर ही रक्कम कशासाठी घेतली हे विचारण्यासाठी जॉर्ज यांनी फोन केल्यावर भामट्याने त्यांचा फोन उचलला नाही. 

टॅग्स :धोकेबाजीगुन्हेगारी