Join us  

रुहदारच्या निर्मितीने कोरोनाबाधित घेणार मोकळा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 5:27 PM

आयआयटी बॉम्बेच्या काश्मिरी तरुणांने केली लो कॉस्ट व्हेंटिलेटरची निर्मिती

 

मुंबई : देशाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत भारतातील ८० % कोरोनाबाधितांमध्ये या संसर्गाची सौम्य लक्षणे आहेत, ५% लोकांना ऑक्सिजन सपोर्टची गरज आहे तर ५ % बाधितांना व्हेंटिलेटरची गरज भासणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांमध्ये व्हेंटिलेटरचा समावेश होतो मात्र  तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा  काढण्यासाठी सरकार  प्रयत्न करत आहे.  या पार्श्ववभूमीवर आयआयटी बॉम्बेच्या इंजिनिअरिंग विभागाचे विद्यार्थी,एनआयटी श्रीनगर आणि इस्लामिक  युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेकनॉलॉजी यांनी कमीत कमी किमतीतील रुहदार नावाचा व्हेंटिलेटर बनविला असून ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.  यामुळे गंभीर असलेल्या रुग्णाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले साहित्य वापरून रुहदार हे लो कॉस्ट व्हेंटिलेटर या विद्यार्थ्यंकडून बनविण्यात आले आहे हे या व्हेंटिलेटचे वैशिष्ट्य आहे.आयआयटी बॉम्बेच्या प्रथम वर्ष ,आयडीसी विभागात शिक्षण घेत असलेला झुल्करनन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट बंद ठेवण्यात आल्यामुळे घरी परतला. काश्मीरमधील अनंतपुरा येथे राहत असलेल्या या विद्यार्थ्याने तेथील परिस्थितीचा आढावा घेतल्यावर तेथे केवळ ९७ व्हेंटिलेटर उपलब्ध आहे हे त्याला कळले आणि परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज घेल्यावर त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने व्हेंटिलेटर बनवण्याचा निर्णय घेतला. पी.एस. सोहेब, आसिफ, शकर नेहवी, माजिद कौल यांनी एकत्र येऊन व्हेंटिलेटर बनवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी एक व्हॉटसअप ग्रुप बनवला आणि त्यामाध्यमातून त्याने व्हेंटिलेटर बनवण्याच्या तयारीला सुरुवात केली. झुल्करनन व त्याच्या मित्रांनी एकत्र येऊन संशोधन करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी मार्केटमध्ये सहज उपलब्ध असलेले साहित्यांच्या आधारे व्हेंटिलेटर कसा बनवता येईल यावर अधिक विचार केला.सलग तीन आठवडे काम केल्यानंतर तीन प्रकारचे व्हेंटिलेटर बनवले. यामध्ये तिसरा प्रकार आम्हाला योग्य वाटला. त्यावर आम्ही अधिक काम करण्यास सुरुवात केली. सध्या बाजारात असलेले व्हेंटिलेटर हे उच्च दर्जाचे आणि महाग आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये व्हेंटिलेटर इतक्या सहज मिळणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेऊन आम्ही स्वस्त दरात व्हेंटिलेटर बनवण्याचा निर्णय घेतला. सध्या बनवण्यात आलेला व्हेंटिलेटर वैद्यकीय चाचणीसाठी  पाठवण्यात येणार आहे. तज्ज्ञाकडून याला मान्यता मिळाल्यानंतर हा व्हेंटिलेटर बाजारात येईल. यासाठी ही टीम कोणत्याही प्रकारची रॉयल्टी घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरची किंमत सात ते आठ लाख इतकी आहे. परंतु आम्ही बनवलेल्या व्हेंटिलेटर्सची किंमत ही फक्त १० हजार इतकी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर याचे प्रोडक्शन करताना ही किमंत आणखी कमी होईल. सध्या आरोग्य क्षेत्रात असलेल्या तुटवड्यावर आमच्या व्हेंटीलेटर्समुळे एक पर्याय निर्माण होण्याची शक्यता आहे.- झुल्करनन, विद्यार्थी, आयडीसी विभाग, आयआयटी बॉम्बे

 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसआयआयटी मुंबईकोरोना वायरस बातम्या