डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 09:17 IST2025-08-12T09:16:53+5:302025-08-12T09:17:27+5:30
सरकारने सरकारी वकिलांशी बोलण्याबाबत पुढाकार घेतला का? तुम्ही त्यांची भेट घेतली का?

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या खटल्यातील विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना हटवण्यात आल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली. "घरत एक अनुभवी वकील आहेत. हा कसोटीचा काळ आहे. या काळात न्यायव्यवस्थेवरील विश्वासाची कसोटी लागते," असे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम आंखड समाजाच्या विश्वासाची कसोटी लागते," असे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम आंखड यांच्या खंडपीठाने नमूद केले.
"सरकारने सरकारी वकिलांशी बोलण्याबाबत पुढाकार घेतला का? तुम्ही त्यांची भेट घेतली का? तुम्ही आयव्हरी टॉवरवर बसून कारवाई करता का? त्यांनी ३०-४० वर्षे काम केले आहे. त्यांनी अनेक खटल्यांत आरोपींना शिक्षा होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणात त्यांना नऊ आरोपींना दोषी ठरविण्यात यश आले," अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला सुनावले.
ते पत्र कोणी लिहिले?
घरत यांनी नायर हॉस्पिटलचे प्रसूती व स्त्रीरोग विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. चिंग लिंग च्यांग यांना आरोपी करण्याबाबत न्यायालयाला अर्ज केला आणि न्यायालयाने अर्ज मंजूर केल्यानंतर घरत यांची खटल्यातून उचलबांगडी करण्यासंदर्भात सरकारला पत्र पाठविण्यात आले. हे पत्र न्यायालयाच्या निदर्शनास आल्यावर हे पत्र कोणी लिहिले? हे योग्य नाही, असे म्हणत खंडपीठाने यासंदर्भातील फाईल पुढील सुनावणीत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले.
डॉ. पायल तडवी आत्महत्या खटल्यातून कोणतेही कारण न देता विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना तडकाफडकी बाजूला करण्यात आले आणि त्यांच्या जागी महेश मुळे यांची नियुक्ती करण्यात आली. सरकारच्या या निर्णयाला पायल तडवीची आई अबेदा तडवी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
अॅड. एस. सी. गावंड यांनी न्यायालयाला सांगितले की, घरत यांची नियुक्ती सरकारने केली होती. अबेदा तडवी यांनी सरकारी वकिलांना खटल्यात मदत करण्यासाठी प्रसिद्ध वकिलांची नियुक्ती केली आहे. घरत यांची नियुक्ती तडवी यांच्या सांगण्यावरून केली नव्हती. त्यावर तडवी यांच्या अॅड. लारा जेसानी यांनी खंडपीठाला सांगितले की, घरत यांची नियुक्ती तडवी कुटुंबीयांनी सरकारला केलेल्या विनंतीवरून करण्यात आली.