The couple got into a dispute, the husband went to jail | दोघींचे झाले भांडण, नवरा गेला तुरुंगात

दोघींचे झाले भांडण, नवरा गेला तुरुंगात

मंगेश कराळे

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सातीवली गावातील वनजमिनीवर काजूच्या झाडाजवळ रंगपंचमीच्या दिवशी सकाळीच एका गोणीत महिलेचा सांगाडा सापडला आणि या भागात एकच खळबळ माजली. माहिती मिळताच वालीव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ही महिला कोण, तिचा मृतदेह गोणीत कसा, कुणी टाकला, या प्रश्नांची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

घटनास्थळाचा पंचनामा करीत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात खून आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करीत तपासकाम सुरू केले. आसपासच्या पोलीस ठाण्यांत तसेच अन्यत्र कुठे कुणी महिला हरवल्याची तक्रार दाखल आहे का? याचा तपशील गोळा करायला पोलिसांनी सुरुवात केली. मात्र तशी काही तक्रार दाखल असल्याची माहिती हाती लागत नव्हती. पोलीस आपल्या परीने प्रयत्न करीतच होते. यात काही दिवस निघून गेले.
एके दिवशी ठाणे क्राईम युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना त्यांच्या एका खबऱ्याने माहिती दिली. ही धक्कादायक माहिती त्या हत्येचा उलगडा करणारी होती. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता संबंधित व्यक्तीला सापळा रचून शिताफीने अटक केली. कुठलाही आरोपी स्वत:चा गुन्हा कधीच कबूल करत नाही. या आरोपीच्या बाबतीतही असेच होत होते. पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. त्यात तो काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्याच्यावरील संंशय बळावला. अखेर त्या महिलेच्या खुनातील आरोपी हाच आहे, हे उघड झाले. त्यानंतर त्या आरोपीचा वालीव पोलिसांना ताबा देण्यात आला.

या प्रकरणाची वालीव पोलिसांनी चौकशी केल्यावर धक्कादायक माहिती समोर येत गेली. आरोपी महाबुबूर रेहमान आझाद झानान शेख (४५) दोन विवाह केले होते. पहिली पत्नी सीमा शेख आणि दुसरी पत्नी पॉली यांच्यासोबत तो नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील साईपूजा बिल्डिंगमध्ये भाड्याने राहात होता. अर्थातच त्या सवतींचे एकमेकींशी अजिबात पटत नव्हते. दुसºया पत्नीची नेहमी पहिल्या पत्नीसोबत भांडणे व्हायची. २०१८ च्या आॅक्टोबर महिन्यात मध्यरात्री महाबुबूर शेख जेवायला बसला असताना दुसºया पत्नीचे पहिल्या पत्नीसोबत भांडण सुरू झाले. नेहमीच्या भांडणांंनी संतापलेल्या महाबुबूर शेखने दुसºया पत्नीचा गळा एवढा जोरात आवळला की, काही क्षणातच ती गतप्राण झाली. भानावर येताच महाबुबूरच्या पायाखालची जमीन सरकली. आता काय करायचे, याचा विचार तो करू लागला. अखेर तिचा मृतदेह त्याने गोणीत भरून ठेवला. दुसºया दिवशी घर रिकामे करून शेजारी राहाणाºया टेम्पोचालक शाका ऊर्फराजू अमीन पिटमी याच्या टेम्पोमधून घरातील सर्व सामान घेऊन तो निघाला. वाटेत सातीवली गावातील जंगलात मृतदेह असलेली ती गोणी फेकून देऊन तो पुढे निघून गेला. यानंतर आरोपी पहिल्या पत्नीसह बांगलादेशला पळून गेला. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी वालीव पोलिसांना गोणीमधील तो मृतदेह सापडला. तो मूळचा बांगलादेशी असल्याने त्याला बांगलादेशातून परत आणणेही कठीण होते. पोलिसांनाही या प्रकरणी काहीच माहिती मिळाली नव्हती. आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला असला तरी बांगलादेशात किती काळ लपून राहणार? तो पुन्हा रोजगारासाठी मुंबईकडे परतला होता. नेमकी हीच माहिती पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना खबºयाकडून मिळाली आणि ठाणे क्राईम युनिट १ च्या पोलिसांनी या सांगाड्याचे गूढ तब्बल नऊ महिन्यांनी उकरून काढत आरोपीला ठाणे रेल्वे स्थानकातून अटक केली.


 

Web Title: The couple got into a dispute, the husband went to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.