The country ranks first in cervical cancer deaths; 5 lakh 70 thousand patients in the world | गर्भाशयाच्या कर्करोग मृत्यूंत देश पहिल्या स्थानी; जगात ५ लाख ७० हजार रुग्ण
गर्भाशयाच्या कर्करोग मृत्यूंत देश पहिल्या स्थानी; जगात ५ लाख ७० हजार रुग्ण

- स्नेहा मोरे

मुंबई : गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंत भारत पहिल्या स्थानावर असल्याचे धक्कादायक वास्तव लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय आरोग्यविषयक अहवालातून समोर आले आहे. भारतानंतर यात चीनचा क्रमांक लागत असून भारतीय स्त्रियांमध्ये हा कर्करोग आढळत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाचा जागतिक पातळीवर अभ्यास केल्यास चीन आणि भारत यांचे प्रमाण गेल्या वर्षभरात तीन टक्के असल्याचे दिसून आले आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच २०१८ साली भारतात गर्भाशयाच्या कर्करोगाचे ९७ हजार रुग्णांची व ६० हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर चीनमध्ये १ लाख ६० हजार रुग्णांची तर ४८ हजार मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय, जगात या आजाराचे ५ लाख ७० हजार रुग्ण आढळून आले आणि ३ लाख ११ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या अहवालानुसार, चीनमध्ये गर्भाशयाच्या कर्करोग रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, तर भारतात मृत्यूसंख्या सर्वाधिक आहे. या दोन्ही देशांचे मिळून या आजाराचे प्रमाण जागतिक स्तरावर ३५ टक्के एवढे आहे. या अहवालाकरिता १८५ देशांतील माहिती संकलित करण्यात आली आहे.
देशात शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात या आजाराचे प्रमाण तुलनेत अधिक आहे. ज्या ठिकाणी या आजारांचे उपचार, नियंत्रण मिळविण्याचे मार्ग कमी आहेत, तेथे हा आजार अधिक आढळून येतो, असे अहवालात म्हटले आहे. तर मुख्यत्वे, मध्यमवयीन महिलांमध्ये या आजाराचे निदान झालेले दिसून आले आहे. महिलांमध्ये सर्वाधिक स्तनाचा कर्करोग आढळतो, त्यानंतर मोठ्या आतड्याचा, फुप्फुसाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग आढळण्याचे प्रमाण आहे.
राज्यात गेल्या वर्षी कर्करोगाने ७२,७६२ मृत्यू
२०१६ आणि २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये कर्करोगाच्या रुग्णांमध्ये पाच हजार ७६१, तर मृतांमध्ये २ हजार ९१९ ने वाढ झाल्याची समोर आली आहे. महाराष्ट्रातही कर्करोगाचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत वाढत आहे. राज्यात कर्करोगामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही गेल्या तीन वर्षांत वाढली आहे. राज्यात गेल्या वर्षी कर्करोगाने ७२,७६२ जणांचा मृत्यू झाला. कर्करोग कोणालाही होऊ शकतो; परंतु त्याच्या प्रमुख कारणांपैकी महत्त्वाचे कारण म्हणजे अनुवांशिकता आणि अनियमित जीवनशैली आहे. वेळीच कर्करोगाचे निदान झाल्यास कर्करोगामुळे होणाºया मृत्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. सध्या तोंडाचा, स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.

गर्भाशयाच्या कर्करोगात सुरुवातीच्या टप्प्यात पांढरे जाणे, योनीमार्गातील द्रावाला दुर्गंधी येणे किंवा समागमानंतर रक्तस्राव होणे यासारखी लक्षणे दिसून येत नाहीत. कर्करोगपूर्व किंवा कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात इमेजिंग तंत्रज्ञानातही हा आजार कळून येत नाही. त्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग भारतीय स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. शिवाय, यातून बचावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कारण, यातील अनेक रुग्णांमध्ये या कर्करोगाचे निदान फारच पुढच्या टप्प्यात होते. गर्भाशयाचा कर्करोग प्राथमिक अवस्थेत ओळखता आला, तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. पॅप स्मिअर या चाचणीमध्ये सहजरीतीने कर्करोगाचे निदान केले जाते. गर्भाशयाचा कर्करोग पुढील दहा वर्षांत होण्याची संभाव्यताही यामध्ये वर्तविली जाते. स्त्रियांनी विशिष्ट वयानंतर ही तपासणी नियमित करावी. - डॉ. इंदर मौर्य, कर्करोगतज्ज्ञ

प्रतिबंधक उपाय
- ह्युमन पॅपिलोमा व्हायरस किंवा एचपीव्ही या विषाणूचा संसर्ग झाल्याने हा कर्करोग होण्याचा संभव असल्याने एचपीव्ही प्रतिबंधक लस घेतल्यानंतर जवळपास ९३ टक्के स्त्रियांमध्ये याचा धोका टाळणे शक्य आहे. यासाठी गाडार्सील आणि सव्हीर्रीक्स अशा दोन लसी आहेत. याचे तीन डोस असतात. ते वयाच्या नवव्या वर्षापासून ते २६व्या वर्षापर्यंत देता येतात. लस घेतली तरी नियमितपणे शारीरिक तपासणी आणि पॅप स्मिअर करणे गरजेचे असते.

Web Title: The country ranks first in cervical cancer deaths; 5 lakh 70 thousand patients in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.