राज्यात प्रिस्क्रिप्शनशिवाय कफसिरपची विक्री सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:04 IST2025-10-09T09:04:33+5:302025-10-09T09:04:44+5:30
लहान मुलांना खोकला झाल्यास अनेक पालक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांच्या दुकानातून कफ सिरप खरेदी करतात.

राज्यात प्रिस्क्रिप्शनशिवाय कफसिरपची विक्री सुरुच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कफ सिरप (खोकल्याचे औषध) घेतल्यामुळे लहान बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांत घडल्या. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खोकल्याच्या औषधांची विक्री न करण्याच्या सूचना विक्रेत्यांना दिल्या होत्या. मात्र, शहरातील काही भागात प्रिस्क्रिप्शनशिवाय ही औषधे मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे.
लहान मुलांना खोकला झाल्यास अनेक पालक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांच्या दुकानातून कफ सिरप खरेदी करतात. मात्र, या अशा वेळी गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी यापूर्वीच व्यक्त केले आहे. मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये घडलेल्या घटनेने अन्न आणि औषध प्रशासन अलर्ट मोडवर गेले आहे. विक्री केल्यास कडक कारवाईचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. ऑल फूड ड्रग व लायसन्स होल्डर फाउंडेशन या संघटनेने मात्र कफ सिरप डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत असल्याचे उदाहरणासह दाखवून दिले आहे.
१० स्टोअर्समधून विकत घेतले कफ सिरप
अन्न व औषध प्रशासनाने कफ सिरप संदर्भात पत्रक काढले असतानासुद्धा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप विकले जात आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील १० मेडिकल स्टोअर्समधून आम्ही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप विकत घेतले आहे. अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्या नियमाची कडक अंमलबजावणी करावी ही आमची मागणी आहे.
अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड ड्रग व लायसन्स होल्डर फाउंडेशन