Join us  

एक किमी वृक्ष लागवडीसाठी एक कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 7:11 PM

समृध्दी महामार्गावरील वृक्षलागवडीसाठी ६७८ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक

मुंबई नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची उभारणी करताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. पर्यावरणाचा झालेला हा -हास भरून काढण्यासाठी या महामार्गावर दुतर्फा सुमारे साडे आठ लाख वृक्षांची लागवड केली जाणार असून त्यासाठी तब्बल ६७८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एक किमी अंतरावर सरासरी १३२६ झाडांची लागवड केली जाणार आहे. प्रति किमी वृक्षलागवडीसाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च होणार आहे.

१० जिल्ह्यातून जाणा-या आणि ५५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या समृध्दी महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून सुरू आहे. या महार्गाचे ३५ टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर, २०२१ पासून या मार्गावरील वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे. रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यापूर्वी या रस्त्यावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. १५ पँकेजमध्ये सुमारे साडे आठ लाख वृक्षांची लागवड येथे होणार आहे. त्यासाठी महामार्गाचा ६६१ किमीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. वृक्षलागवडीसाठी दोन वर्ष आणि पुढील पाच वर्षे त्यांची देखभाल या तत्वावर ही कामे कंत्राटदारांना दिली जाणार आहेत. त्यानुसार प्रत्येत झाडासाठी सरासरी ७,६०० रुपये खर्च करण्याची एमएसआरडीसीची तयारी आहे. या कामांसाठीच्या निविदा एमएसआरडीसीने प्रसिध्द केल्या असून ३१ आँक्टोबरपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.

या वृक्ष लागवडीसाठी लखनऊ येथील राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे. ज्या ठिकाणी वृक्ष लागवड करायची आहे तिथली माती, हवा, पाणी, पर्जन्य प्रमाण व हवामानाची स्थिती याचा सखोल अभ्यास करून कोणत्या प्रकारची वृक्ष लागवड करायची याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानसारत वृक्ष लागवड करण्याचे बंधन कंत्राटदारांवर असेल. भारतीय रस्ते परिषदेच्या नियमात महामार्गादरम्यान प्रती किमी अंतरावर ५८३ झाडे लावावीत असा निकष आहे. परंतु, एमएसआरडीसी या महामार्गावर प्रति किमी १३२६ झाडांची लागवड केली जाणार आहे.

टॅग्स :महामार्गमुंबईनागपूरराज्य सरकाररस्ते वाहतूक