Join us  

मेट्रो तीनचा खर्च हजार कोटींनी वाढला- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 4:32 AM

याचिका वेळेत निकाली निघण्याची व्यक्त केली अपेक्षा

मुंबई : प्रकल्पांच्या विरोधातील याचिकांमुळे दिवसाला लाखोंचा तर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो. शिवाय प्रकल्पाच्या किंमतीही हजारो कोटींनी वाढतात. पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत मार्गी लागावेत यासाठी १०० कोटी रुपयांच्या वरील प्रकल्पांच्या विरोधातील खटले कालबद्ध पद्धतील निकाली काढणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विधि व न्याय विभागाचा सल्ला घेतला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत केले.मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पामुळे बाधित कोळीवाड्यांचा मुद्दा काँग्रेस सदस्य अनंत गाडगीळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. कोस्टल रोडसह विविध प्रकल्पांना विलंब होत असल्याचा आक्षेप विरोधी सदस्यांनी उपस्थित केला. यावर, प्रकल्पासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या. मात्र, विविध कारणांमुळे लोक न्यायालयात गेल्याने प्रकल्प रखडत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. काम रात्री करावे की सकाळी याबाबात परस्परविरोधी याचिका न्यायालयात दाखल झाल्यामुळे मेट्रो ३ च्या कामाला विलंब झाला आणि या प्रकल्पाचा खर्च एक हजार कोटींनी वाढला. रो रो सेवेसंदर्भात सर्व तयारी झालेली असताना एक कंत्राटदार न्यायालयात गेला आणि सहा महिन्यांपासून विषय तसाच पडून आहे. किमान शंभर कोटींहून मोठ्या रकमेच्या पायाभूत विकास प्रकल्पांबाबतच्या याचिका निश्चित कालावधीत निकामी काढणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयाच्या अधिकारांना बाधा न आणता काही आराखडा ठरविता येतो का, यासाठी विधी व न्याय विभागाचा सल्ला घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.‘मच्छीमारांना वाऱ्यावर सोडणार नाही’कोस्टल रोडमुळे मच्छीमारांचा व्यवसाय बुडेल ही भीती निराधार आहे. अशाच भीतीपोटी वांद्रे-वरळी सी लिंक उभारताना न्यायालयीन लढा देण्यात आला. पुढे ही भीती व्यर्थ ठरली. कोस्टल रोडचे नियोजन करताना या बाबींची काळजी घेण्यात आली आहे. तरीही मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम झाल्यास ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या धर्तीवर पुनर्वसनाची व्यवस्था केली जाईल. मासेमारी करणाऱ्यांना वाºयावर सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गावठाणांच्या सीमांकनाची ५० वर्षांपासूनची कोळीवाड्यांची मागणी या सरकारने मान्य केली आहे. १२ कोळीवाड्यांच्या सीमांकनांचे काम पूर्ण झाले आहे.

टॅग्स :मेट्रोदेवेंद्र फडणवीस