corporator kishori pednekar will be next mumbai mayor from shivsena | मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर 
मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर 

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदासाठी सुहास वाडकर यांची निवड करण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर यांनी आज महापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. 

मुंबई महापालिका महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. खुला प्रवर्ग असल्याने महापौरपदासाठी सत्ताधारी शिवसेनेतील नगरसेवकांमध्ये चढाओढ निर्माण झाली होती. पक्षाचे सर्वात वजनदार नगरसेवक व 'मातोश्री'शी थेट संबंध असलेले स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह किशोरी पेडणेकर, मंगेश सातमकर, आशिष चेंबूरकर या नगरसेवकांची नावे सर्वाधिक चर्चेत होती. मात्र, यातून किशोरी पेडणेकर यांनी बाजी मारली आहे. तर उपमहापौर पदासाठी सुहास वाडकर यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील प्रचारात किशोरी पेडणेकर यांनी मोठे योगदान दिले होते. किशोरी पेडणेकर या वरळी येथील शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका व प्रवक्त्या आहेत. 

दरम्यान, मुंबईसह राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदासाठीची लॉटरी बुधवारी काढण्यात आली असून, यंदा मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मुंबईचे प्रथम नागरिक म्हणजे महापौर म्हणून ओळखले जाणारे हे पद प्रतिष्ठेचे मानले जाते. अडीच वर्षांचा कार्यकाळ असलेल्या या पदासाठी मुंबई महापालिकेत २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या पदाच्या आरक्षणाची सोडत नगरविकास विभागाने बुधवारी काढली. या सोडतीत मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मनसेच्या सहा नगरसेवकांनी प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील बळ वाढले आहे. राज्यातील सत्तासंघर्षापासून शिवसेनेचे महापौरपद सध्या सुरक्षित आहे. हे पद खुले झाल्यामुळे इच्छुकांची यादी वाढली आहे.

सध्याच्या काळात शिवसेनेचा मोठा प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाने महापौरपदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीनेही आपला उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे शिवसेनेचा महापौरपदाच्या निवडणुकीत किशोर पेडणेकर यांचा विजय सुकर झाला आहे. 

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना : ९४
भाजप : ८२
काँग्रेस : २९, राष्ट्रवादी : ८
समाजवादी पक्ष : ६
 

Web Title: corporator kishori pednekar will be next mumbai mayor from shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.