Join us

Coronavirus : खासगी आस्थापनांमध्ये 'वर्क फ्राॅम होम', जास्तीतजास्त ५० टक्के उपस्थिती ठेवता येणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 07:04 IST

Coronavirus in Maharashtra News : साथ प्रतिबंधक कायद्याच्या आधारे महापालिका आयुक्तांनी आज सायंकाळी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार आणि संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी आस्थापनांत 'वर्क फ्राॅम होम' बंधनकारक करण्यात आले आहे. अत्यावश्यक सुविधा वगळता अन्य सर्व कंपन्याच्या कार्यालयातील उपस्थिती केवळ पन्नास टक्के ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत. 

साथ प्रतिबंधक कायद्याच्या आधारे महापालिका आयुक्तांनी आज सायंकाळी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. यात अत्यावश्यक सेवा म्हणून पाणी, मलनिस्सारण, बँक सेवा, टेलिफोन आणि इंटरनेट, रेल्वे आणि वाहतूक व्यवस्था, रुग्णालये, मेडिकल आणि अन्नधान्य तसेच किराणा या आस्थापनांना वगळण्यात आले आहे. या व्यतिरिक्त उर्वरित सर्व आस्थापनांना कार्यालयात एकावेळी जास्तीतजास्त पन्नास टक्के उपस्थिती ठेवण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय खासगी आस्थापनांनी 'वर्क फ्राॅम होम' धोरणाचा वापर करावा, असे आवाहन प्रवीण परदेशी यांनी केले आहे.

याशिवाय, कस्तुरबा गांधी रूग्णालय, के.ई.एम. आणि सेव्हन हिल्स् रूग्णालयात कोरोना चे विलगीकरण कक्ष असल्याने या परिसरातील वाहतूकीवर नियंत्रित करण्यात येणार आहे. शाळा, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, जिम आदींना यापुर्वीच बंद करण्यात आले आहेत. पालिका उपायुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांनी या निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी आवश्य कार्यवाही करावी, असे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मुंबई पालिकेप्रमाणे राज्यातील अन्य भागातही आवश्यकतेनुसार  वर्क फ्राॅम होम लागू होण्याची शक्यता आहे. मंगळवारी याबाबत निर्णय अपेक्षित आहे.  

 विलगीकरणांसाठी हाॅटेल रूम्स ताब्यात 

मेडीसन ग्रुपच्या मिराज मध्ये २०, आयटीसी मराठा १००, अंधेरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसमधील ७० आणि निरंता एअरपोर्ट ट्रान्झिट हाॅटेलमधील ५० रूमस् कोरोनाबाधित देशांतून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणी, समुपदेशन आणि अलगीकरणासाठी ताब्यात घेतले जाणार आहेत. मात्र, जे प्रवासी या हाॅटेलमधील रूमचे भाडे देण्यास तयार असतील त्यांनाच येथील व्यवस्थेचा लाभ घेता येणार आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोनामुंबई