Join us  

Coronavirus : जनता कर्फ्यू काळातही धावणार ‘बेस्ट’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 2:10 AM

Coronavirus : मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.

मुंबई : कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात रविवारी जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या काळात सर्व नागरिकांना सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे बंदच्या काळातही कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांना ‘बेस्ट’ दिलासा मिळणार आहे.मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून राज्य सरकारने यापूर्वीच शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय बंद ठेवली आहेत. तसेच दुकानही एक दिवसाआड सुरू राहणार आहेत. यामुळे गेल्या चार दिवसांमध्ये प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. २० मार्च रोजी २० लाख प्रवाशांनी बेस्टच्या बसगाड्यांमधून प्रवास केला. बेस्टमधून उभ्याने प्रवास करण्यास यापूर्वीच मनाई करण्यात आली आहे.मात्र प्रवासी संख्या कमी होत असली तरी मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेली बेस्ट सेवा रविवारीदेखील बंदच्या काळात रस्त्यावर धावणार आहे. दररोज बेस्ट उपक्रमाच्या सुमारे तीन हजार बसगाड्या रस्त्यावर चालविण्यात येतात. रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने बसफेºया कमी करण्यात येतात. परंतु, बस आगार व्यवस्थापकांच्या नियोजनाप्रमाणे आवश्यकतेनुसार बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.- दररोज सोमवार ते शुक्रवार सुमारे ३१०० बसगाड्या रस्त्यावर चालविण्यात येतात. रविवारी रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असल्याने लोकांची गैरसोय टाळण्यासाठी बस गाड्यांचे नियोजन केले जाते.- जनता कर्फ्यूच्या काळात आवश्यक सेवा सुरूच राहणार असल्याने त्यांच्या सोयीसाठी बेस्ट धावून आली आहे.- रविवारच्या वेळापत्रकानुसार बेस्टच्या बसगाड्या बंदच्या काळात चालवण्यात येतील.- ३ मार्च रोजी ३२ लाख ३० हजार ५०५ प्रवाशांनी प्रवास केला. तर २० मार्च रोजी प्रवासी संख्या २० लाख २६ हजार एवढी नोंद झाली आहे.

टॅग्स :बेस्टमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस