Join us

Coronavirus: कोरोनाग्रस्त मुलांना वेळेत उपचारासाठी काय केले ? उच्च न्यायालयाचा मुंबई पालिकेला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 06:33 IST

Coronavirus in Mumbai: १२ मेच्या सुनावणीत ११००० मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले. ही आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे मुलांवर पुरेसे व वेळेत उपचारासाठी काय करता येईल?

 मुंबई : ९ मे पर्यंत मुंबईत १२,००० मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली. आतापर्यंत १७ मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी न्या. अमजद सय्यद व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली. त्यावर न्यायालयाने मुलांवर वेळेत व पुरेसे उपचार करण्यासाठी काय करण्यात येते, असा प्रश्न पालिकेला केला.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिकेने आरोग्यासंबंधी सर्व पायाभूत सुविधा अद्ययावत केल्या आहेत. मुलांवरील उपचारासाठी राज्य सरकारने विशेष व्यवस्था केली आहे. आता केवळ दोन मुले कोरोनावर उपचार घेत आहेत. आम्ही त्यांच्यासाठी स्वतंत्र खाटा ठेवल्या आहेत, असे साखरे यांनी न्यायालयाला सांगितले. मुलांचे पालक, त्यांचे काळजीवाहू यांच्यासाठीही सोय आहे. त्यांनी लस घेणे गरजेचे आहे, असेही साखरे यांनी म्हटले. पालिकेने वार्षिक महसुलातील १२ टक्के महसूल आरोग्य सुविधांसाठी वापरला, अशीही माहिती त्यांनी दिली. त्यावर न्यायालयाने म्हटले की, १२ मेच्या सुनावणीत ११००० मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले. ही आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे मुलांवर पुरेसे व वेळेत उपचारासाठी काय करता येईल? असे विचारत न्यायालयाने  या याचिकेवरील सुनावणी २ जून रोजी ठेवली. 

बैठक का घेतली नाही?न्यायालयाने मुंबई महापालिकेचे पॅटर्न राज्यातील सर्व महापालिकांनी राबवावे, अशी पुन्हा सूचना केली. मुंबई पालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल यांनी राज्यातील सर्व पालिकांच्या आयुक्तांबरोबर व्हीसीद्वारे बैठक का घेतली नाही? असा सवाल न्यायालयाने राज्य सरकारला केला. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिकामुंबई हायकोर्ट