Join us

coronavirus: सेरो सर्वेक्षणातून आतापर्यंत दोन हजार नमुने संकलित, कोरोनाचा सामूहिक संसर्ग समजून घेण्याचा हेतू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 01:31 IST

सेरो सर्वेक्षणाच्या माध्यमातून रक्ताचे नमुने घेण्यात येत आहे. एम/पश्चिम, एफ/उत्तर आणि आर/उत्तर या तीन विभागांची सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली असून झोपडपट्टी भागात आणि झोपडपट्टी नसलेल्या भागांत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेने कोविड-१९ विषाणू सामुदायिक संसर्ग समजून घेण्यासाठी नीती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई आणि अन्य संस्था यांच्या सहकार्याने सेरो सर्वेक्षणास मागील आठवड्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत या सर्वेक्षणाच्या माध्यमातून दोन हजार नमुने संकलित करण्यात आले आहेत.सेरो सर्वेक्षणाच्या माध्यमातून रक्ताचे नमुने घेण्यात येत आहे. एम/पश्चिम, एफ/उत्तर आणि आर/उत्तर या तीन विभागांची सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली असून झोपडपट्टी भागात आणि झोपडपट्टी नसलेल्या भागांत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये १0 हजार यादृच्छिक पद्धत (रेंडम)ने संकलित करण्यात आले आहे, त्यासाठी सहभागी होणाऱ्यांची संमती घेतली जात आहे. या उपक्रमाला झोपडपट्टी परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे दोन हजार नमुने संकलित करण्यात आले आहेत.याविषयी, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्चचे प्राध्यापक उल्लास कोलथुर यांनी सांगितले, सर्व परिसरांमध्ये सर्व लोकसंख्येमध्ये संक्रमणाचा झालेला भौगोलिक फैलाव समजून घेत त्यांचे संनियंत्रण करणे हे अत्यंत निर्णायक स्वरूपाचे आहे. त्यामुळे या सर्वेक्षणआधारित अभ्यासामध्ये शास्त्रीयदृष्ट्या ठरवून दिलेली यादृच्छिक पद्धत अवलंबण्यात येत आहे. या संक्रमणाची लागण होण्याचा धोका असलेल्या अन्य आजारांबाबत किंवा विशिष्ट वय/लिंग अशा गटांच्या असलेल्या त्याच्या धोक्याबाबत माहिती देण्यासाठीही हे सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. याच कारणांनी यामध्ये कृतिशील सहभाग हा निर्णायक आहे. कारण शहराचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी त्याचा प्रभाव पडेल. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई