CoronaVirus News: मुंबईत आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 05:12 IST2020-06-16T05:11:47+5:302020-06-16T05:12:04+5:30
आतापर्यंत २८ जणांनी गमावला जीव

CoronaVirus News: मुंबईत आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई : मुंबई पोलीस दलातील आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे राज्यभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा ४२ वर गेला असून यातील २८ जण मुंबई पोलीस दलातील आहेत.
जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार जोगेश्वरी परिसरात कुटुंबासह राहत होते. क्षयरोग झाल्याने आॅगस्ट २०१९ पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे ते रजेवर होते. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. रविवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
तर, मरोळ पोलीस वसाहतीत कुटुंबासोबत राहणारे अंमलदार अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांना त्रास होत असल्याने सेव्हन हिल रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र कोरोनावरील उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलीस दलातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यभरात एकूण १३८८ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत.