Join us  

CoronaVirus : 'मुंबई-पुण्यासह पाच शहरांमधील थिएटर्स, जीम बंद; परीक्षांबाबत लवकरच घोषणा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 5:44 PM

सरकारकडून आज मध्यरात्रीपासून काही संस्था बंद करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये व्यायामशाळा, जीम, चित्रपटगृहे, नाट्येगृहे, जलतरणतलाव यांचा समावेश आहे.

मुंबई - राज्यात कोरोनाचे एकूण 17 रुग्ण असून त्यांना आयसोलेशन (विलगीकरण) वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये, एक ते दोन सोडून इतर सर्व दुबई, फ्रान्स व अमेरिकेतून आलेले आहेत. सुदैवाने या सर्वच रुग्णांना गंभीर स्वरुपाची लक्षणे दिसत नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून महानगरातील काही संस्था आजपासून बंद राहतील, असे उद्धव ठाकरेंनी सांगतिले.  

सरकारकडून आज मध्यरात्रीपासून काही संस्था बंद करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये व्यायामशाळा, जीम, चित्रपटगृहे, नाट्येगृहे, जलतरणतलाव यांचा समावेश आहे. मात्र, हा नियम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरीचिंचवड आणि नागपूर या शहरांनाच लागू करण्यात आला आहे. तसेच, पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील शाळा बंद करण्यात येत आहेत. मात्र, तेथील परीक्षा सुरळीतपणे आणि नियमित वेळापत्रकानुसार होणार आहेत, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

जिथं जिथं शक्य आहे, तिथं खासगी कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन राज्य सरकारने कंपन्यांना केले आहे. तसेच, नागरिकांना घाबरून जायचं काहीही कारण नाही. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून हे निर्णय घेण्यात आले आहेत. आपल्या राज्यातील परिस्थिती अजिबात गंभीर नसून आपण आरोग्य विभागाने दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शनाचं पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेकोरोनामुंबईविधान भवनशाळा